प्रतिनिधी – प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : शिवसेनेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने मोठी वातावरण निर्मिती केली आहे. शहरात मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार आणि देशभरातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी सुमारे ४० कमानी, १०० होर्डिंग आणि ७०० फलक उभारण्यात आले आहेत.
चौकाचौकात भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. विमानतळापासून अधिवेशन स्थळापर्यंत तसेच अंबाबाई मंदिरापर्यंत आणि शहरातील प्रमुख चौकात लक्षवेधी फलक लावले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचे हे शिवसेनेचे पहिले अधिवेशन असून त्यादृष्टीने याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मंत्री, खासदार, आमदार आणि देशभरातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या निवासासाठी शासकीय विश्रामगृहे आणि शहरासह आसपासच्या भागातील सर्वच हॉटेल्स आरक्षित करण्यात आली आहेत. हॉटेल्सवरून अधिवेशन ठिकाणी पोहोचविण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्वांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी युवा सेनेवर सोपविण्यात आली आहे. युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे नियोजन करण्यात येत आहे.
अधिवेशनाला येणाऱ्या सर्वांची जेवण, नाष्ट्याची व्यवस्थाही अधिवेशनस्थळी करण्यात आली आहे. त्यासाठी दोन प्रशस्त मंडप महासैनिक दरबार मैदान येथे घालण्यात आले आहेत. गुरुवारी दुपारी राजेश क्षीरसागर यांनी या सर्व सुविधांची पाहणी करून नियोजनाबाबत सूचना दिल्या. यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, जिल्हा युवा संपर्क अधिकारी प्रसाद चव्हाण, शहरप्रमुख पीयूष चव्हाण, गणेश रांगणेकर, अंकुश निपाणीकर, नीलेश हंकारे, अर्जुन आंबी, रियाज बागवान उपस्थित होते.