कोल्हापूर : पत्रकारांच्या सन्मान योजनेतील प्रस्ताव मंजूरीमध्ये कागदोपत्री अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांची छाननी करण्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पातळीवर समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केली.
काेल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत हाेते. व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, कोल्हापूरच्यापत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हाडाशी बोलेन. पत्रकार भवनासाठी जागा देण्यासाठी महापालिका आयुक्तांना सांगितले जाईल. मात्र या सर्व कामांचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. कोल्हापूर प्रेस क्लबने केवळ पत्रकारिता न करता सामाजिक उपक्रम राबवले ही चांगली बाब आहे.
क्षीरसागर म्हणाले, कोल्हापुरात जेव्हा महापूर आला तेव्हा तीनशे वाहनांसह मनुष्यबळ घेवून येणारे नेते म्हणून मुख्यमंत्री शिंदें यांची कोल्हापूरला ओळख आहे. पत्रकारांच्या प्रश्र्नांची ते नक्कीच सोडवणूक करतील.
यावेळी पत्रकार विजय केसरकर, संतोष पाटील, छायाचित्रकार बी. डी. चेचर, कॅमेरामन निलेश शेवाळे यांना शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेव गिरी, सदस्य समीर देशपांडे आणि प्रेस क्लबचे सचिव बाबुराव रानगे यांचाही सत्कार झाला. प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी क्लबच्या उपक्रमांचा आढावा घेतला. उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांनी स्वागत केले. याआधी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले