कोल्हापूर शहरास शुद्ध आणि कायमस्वरुपी पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी थेट जलवाहिनी प्रकल्पासह शहरातील १०० कोटींचे रस्ते व अन्य विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत उपलब्ध निधीतून खरेदी केलेल्या वाहनांचे लोकार्पणदेखील करण्यात आले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून सुमारे १०० कोटी रुपये खर्चाच्या रस्ते प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
शहीद जवान संभाजी भिमसेन बागडी यांच्या मातोश्रींना पाच एकर शेतजमीन वाटप केलेल्या जमीनीचा सातबारा आणि ८ अ प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने अनुकंपा तत्वावर २६ जणांना शासन सेवेत सामावून घेतले असून त्यातील दोघा उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्रे देण्यात आली.
पंचगंगा प्रदुषणमुक्त करण्यासाठी नदीत जाणाऱ्या उर्वरित सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ३४० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तिरूपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर पंढरपूरसह कोल्हापूर जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी अंबाबाई व जोतिबा देवस्थानचा आराखडा तयार केला जात आहे. कोल्हापूरचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देतानाच पुरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ३२०० कोटी रूपये जागतिक बँकेकडून मंजूर केल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध अडचणी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम नियुक्तीचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू असे जाहीर करतानाच कोल्हापूरातून नागपूर- गोवा शक्तीपीठामुळे येत्या काळात दळणवळण यंत्रणा सुधारेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
पालकमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी आदी मान्यवर उपस्थित होते.