कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड केलं. त्यानंतर आमदाराच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोहचला. प्रदीर्घकाळ सुनावणी घेत कोर्टाने अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला.
यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्षानंतर राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली.या नंतर शिंदे गटाकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे.
कारण, शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे चक्क ६००० हजार पानांचं लेखी उत्तर सादर केल्याची माहिती मिळत आहे. या ६ हजार पानांच्या लेखी उत्तरात आमदारांनी नेमकं काय म्हटलं आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर ठाकरे गट आता काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदत संपल्याचा दावाही ठाकरे गटाकडून केला जात आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी बुधवारी (23 ऑगस्ट)रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीसची वेळ संपली असून कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला.
यावर राहुल नार्वेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “आमदारांच्या अपात्रता प्रकरणात कारवाई सुरू असल्याची माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेत असतात त्यावेळी ते ‘क्वाजय ज्युडिशियल ऑथेरिटी’ म्हणून काम करत असतात याचं मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कायदेशीर व नियमानुसार कारवाई केली जाईल, असंही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, आमदारांना सुनावणीसाठी कधी बोलावलं जाईल यावरही राहुल नार्वेकरांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली. “लवकरच सुनावणी चालू करण्यात येईल. इतर प्रक्रिया सुरू आहेत. मी सांगू इच्छीतो की, यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. तसेच नियमांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती राहुल नार्वेकरांनी यावेळी दिली.