कात्यायनी ज्वेलर्स दरोड्यातील १०४ ग्रॅम सोने, पिस्तूल जप्त, मध्य प्रदेशात जाऊन कोल्हापूर पोलिसांची कारवाई

0
114

कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्सवर ८ जून २०२३ रोजी भरदिवसा दरोडा टाकून पळालेल्या टोळीतील पाचवा संशयित पवन शर्मा याच्याकडून पोलिसांनी दरोड्यातील १०४ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक पिस्तूल आणि चार काडतुसे असा ६ लाख ७६ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातील मुरैना येथे जाऊन ही कारवाई केली. आजवर या गुन्ह्यातील सुमारे ४६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडा टाकून परराज्यातील दरोडेखोरांनी सुमारे एक कोटी ८७ लाखांचे दागिने आणि दीड लाखांची रोकड लंपास केली होती. त्या गुन्ह्यातील तीन स्थानिक संशयितांसह दोन परप्रांतीय दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.

मध्य प्रदेशातील मुरैना येथून १५ दिवसांपूर्वी अटक केलेला दरोडेखोर पवन शर्मा याला पोलिस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक त्याला घेऊन पुन्हा मुरैना येथे गेले होते.

दरोड्यानंतर वाटणीला आलेले दागिने त्याने मुरैना येथील एका सराफाला विकले होते. ते दागिने मिळवून पोलिसांनी १०४ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त केली. निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार रामचंद्र कोळी, संजय कुंभार, अमित मर्दाने, विनोद कांबळे, विलास किरोळकर, राजेंद्र वरंडेकर आणि सागर चौगले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आता फक्त दोघे राहिले

दरोड्याच्या गुन्ह्यातील स्थानिक आरोपी सतीश ऊर्फ संदीप सखाराम पोहाळकर, विशाल धनाजी वरेकर, अंबाजी शिवाजी सुळेकर या तिघांसह परप्रांतीय चार दरोडेखोरांपैकी अंकित शर्मा आणि पवन शर्मा यो दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. अन्य दोन परप्रांतीय दरोडेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती निरीक्षक कळमकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here