अथर्व दौलत’च्या जखमी कामगाराचा मृत्यू, ड्रेन व्हॉल्व उघडताना तोल जाऊन पडले होते उंचावरून

0
50

चंदगड : ड्रेन व्हाॅल्व उघडताना तोल जाऊन उंचावरून पडल्याने पंधरा दिवसांपूर्वी हलकर्णी येथील अथर्व-दौलत कारखान्यात गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारखान्याकडून मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ढेकोळवाडी ग्रामस्थांनी कारखाना प्रशासनासमोर मागणी उचलून धरत कारखाना कार्यस्थळावर रुग्णवाहिकेतून मृतदेह ठेवल्यामुळे रविवारी रात्री उशिरापर्यंत वातावरण तणावपूर्ण बनले होते.

गुंडू रामू पाटील (वय ५१, रा. ढेकोळवाडी) असे मृत कामगाराचे नाव आहे. गुंडू हा १७ फेब्रुवारी रोजी कामावर असताना ड्रेन व्हाॅल्व उघडताना १२ फूट उंचावरून खाली पडला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

त्याला उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी उपचार सुरू असताना गुंडू याचे निधन झाले. घटनेची नोंद चंदगड पोलिसात करण्यात आली आहे.

दरम्यान कामगाराच्या पश्चात त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून मृत गुंडूच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय कारखाना कार्यस्थळावरुन मृतदेह हलवणार नाही, असा पवित्रा घेतला.

गेल्या काही दिवसांपूर्वीही एका कारखान्यातील कामगाराला त्या प्रशासनाने मोठी भरपाई दिली, असे सांगत पोलिस असतानाही वातावरण तणावपूर्ण बनले होते. रात्री उशिरापर्यंत यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे कारखानाही बंद करण्यात आला होता. ग्रामस्थांसह नातेवाईक आक्रमक झाल्याने पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, पोलिस निरीक्षक नितीन सावंत, सहायक पोलिस निरीक्षक लाला गाढवे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून होते.

नियमानुसार भरपाई देण्यास तयार

कामगाराचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असून नियमानुसार होणारी भरपाई देण्यासाठी कारखाना प्रशासन तयार आहे, अशी माहिती सचिव विजय मराठे यांनी सांगितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here