रमजानमुळे आखाती देशात हापूस आंब्याला वाढती मागणी

0
57

रत्नागिरी : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला असला, तरी वाशीमध्ये कोकणातील हापूस आंबा विक्रीसाठी दाखल होत आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान मास दि. १२ मार्चपासून सुरू होत असल्याने आखाती देशातून आंब्यासाठी मागणी वाढत आहे.

त्यामुळे दर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. सोमवारी वाशी मार्केटमध्ये १८ हजार ५९ आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या. त्यात कोकणातून १३ हजार ५३२, तर अन्य राज्यांतील ४,५२७ पेट्यांचा समावेश आहे.

अवकाळी पाऊस, नीचतम तापमान, ढगाळ हवामानामुळे आंब्यावर कीडरोड, बुरशीसह तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा आंबा पीक बंपर येण्याच्या आशेवर पाणी फिरले. नैसर्गिक दुष्टचक्रातून वाचलेला आंबा डिसेंबर, जानेवारीपासून विक्रीस येत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पाच-दहा हजार पेटी दररोज वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी जात आहे. मात्र, त्यामध्ये निम्म्यापेक्षा अधिक आंबा कर्नाटक, केरळ, तामिळनाडू येथील आहे. उर्वरित ४० ते ४५ टक्के आंबा कोकणातील असून, त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आंबा अधिक आहे.

वाशी मार्केटमध्ये आलेल्या आंब्यापैकी ७० ते ७५ टक्के आंबा आखाती प्रदेशात पाठविला जातो. उर्वरित पाच टक्के मुंबईत, तर उर्वरित २० टक्के अन्य देशांत व राज्यात विक्रीसाठी पाठविला जातो. मुस्लिम देशामध्ये रमजानमुळे फळांना वाढती मागणी असते. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच रमजान असल्याने आंब्याला शेवटपर्यंत मागणी चांगली राहणार असल्याने दरही बऱ्यापैकी स्थिर राहणार असल्याचे विक्रेत्यांमधून सांगण्यात येत आहे.

  • आंबा लागवड क्षेत्र – ६६, ४३३ हेक्टर
  • वार्षिक उत्पादन – एक ते सव्वा लाख टन
  • परदेशी विक्री – ६० हजार टन
  • स्थानिक विक्री – २० हजार टन
  • कॅनिग साठी – २० हजार टन
  • वार्षिक उलाढाल ७०० ते ८०० कोटी

दर न परवडणारा

सध्या वाशी मार्केटमध्ये आंबा पेटीला दोन हजार ते पाच हजार रुपये दर मिळत आहे. खत, कीटकनाशके, वाहतूक खर्च, मजुरी, काढणी, पिंजरा (खोका) या सर्व बाबींचा विचार करता पेटीला मिळणारा दर परवडत नसल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे.

हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर होतो. खत व्यवस्थापनापासून आंबा काढणी ते विक्रीसाठी पाठवेपर्यंत प्रचंड खर्च येतो. त्यामुळे आंब्याचे दर टिकून राहणे गरजेचे आहे. दर टिकले तर शेतकऱ्यांनी केलेला खर्च काहीअंशी भरून काढण्यासाठी मदत होणार आहे. – राजन कदम, बागायतदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here