
प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
पाचगाव–उजळाईवाडी परिसरात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून, ग्रामदैवत आसोबा देवालयात पार पडलेल्या प्रचार शुभारंभाने संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम गोपाळराव पाटील व उजळाईवाडी पंचायत समितीच्या उमेदवार शिल्पा संदीप हजारे यांच्या प्रचाराचा शुभारंभ भक्तिभावाच्या वातावरणात करण्यात आला.आसोबा देवाच्या चरणी नतमस्तक होत विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रचाराचा प्रारंभ झाला. देवाच्या साक्षीने जनतेच्या सेवेसाठी लढा देण्याचा निर्धार उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला.
यावेळी सरपंच उत्तम आंबवडे, उपसरपंच प्रकाश पाटील, तंटामुक्त अध्यक्ष नायकु बागणे, संदीप पोवार, शिवाजी माने, सुनील गुमाणे, प्रकाश सुर्यवंशी, नंदकुमार गजणे, संपत दळवी, डी. जी. माने, काकासो पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचारादरम्यान ठिकठिकाणी उमेदवारांचे औक्षण करून, हार घालून, प्रेमाने स्वागत करण्यात आले. अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांनी “हे आपलेच माणूस आहेत, आम्ही नक्की विजयी करणार” अशा भावना व्यक्त केल्या. कॉग्रेसच्या उमेदवारांना मिळणारा हा वाढता भावनिक पाठिंबा पाहता परिसरात परिवर्तनाची आशा बळावत असल्याचे चित्र दिसून आले.
“गावासाठी, माणसांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी काम करणाऱ्यांनाच संधी मिळाली पाहिजे,” अशी भावना मतदारांनी व्यक्त करत संग्राम पाटील व शिल्पा हजारे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला.या प्रचार शुभारंभामुळे पाचगाव–उजळाईवाडी परिसरात केवळ राजकीय नव्हे तर नात्यांची, विश्वासाची आणि भावनांची लढाई सुरू झाल्याचे स्पष्ट झाले असून, काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला नवे बळ मिळाले आहे.

