
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले असून मतदारसंघात भरघोस निधी आणून नेते मंडळी विकासकामांचा नारळ फोडत आहेत. या विकासकामांची माहिती देण्यासाठी हातकणंगले मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांनी फलक उभारले आहेत.
याफलकावर एक क्युआर कोड देण्यात आला होता. हा क्युआर कोड स्कॅन करताच सर्व विकासकामांची माहिती नागरिकांनी मिळणार होती. मात्र झालं भलतच.. कोड स्कॅन करताच भलतीच वेबसाईट ओपन होत आहे. यामुळे सोशल मीडियावर खासदारांना ट्रोल केले जात आहे.
कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही विद्यमान खासदारांनी आतापासूनच गावोगावी प्रचाराला सुरुवात केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आपल्या कार्यकाळात आपण मतदार संघासाठी किती निधी आणला नी किती विकास कामे केली याचा चढता आलेख नागरिकांना दाखवण्यासाठी त्यांनी एक नामी शक्कल लढवली.
सध्या डिजिटल युग असल्याने त्यांनी आपण केलेल्या विकासकामांची माहिती देणाऱ्या फलकावर माहिती जाणून घेण्यासाठी जो क्यूआर कोड दिला आहे. तो फेक असल्याची बाब समोर आली आहे. माने यांच्याच मतदारसंघातील काही तरुणांनी क्यूआर कोड स्कॅन केला, मात्र त्यानंतर वेगळीच वेबसाईट उघडत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल ही झाला आहे.
या प्रकारानंतर ज्या ज्या पोस्टर वर हे क्युआर कोड लावले होते ते आता लपवण्याची वेळ आली आहे. अनेक भागात त्या कोडला आता झाकलेले पाहायला मिळत आहेत. खासदारांनी निधी किती आणला नी कामे किती झाली यापेक्षा नागरिकांमध्ये या फेक कयुआरकोड प्रकरणाची चर्चा मात्र जोरदार रंगलेली पाहायला मिळत आहे.
