‘गोकुळ’च्या पशुखाद्य कारखान्यात ३५ लाखांचा अपहार, संचालक मंडळात अस्वस्थता

0
34

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील पशुखाद्य कारखान्यात वाहतुकीचे अंतर वाढवून सुमारे ३५ लाखांचा अपहार झाला आहे. ही वाहतूक संस्था संघातील एका जबाबदार पदाधिकाऱ्याशी संबंधित असून अपहाराचे प्रकरण बाहेर आले.

यामध्ये एका अधिकाऱ्यासह चार कर्मचाऱ्यांचा सहभाग असून, एका कर्मचाऱ्यावर हे प्रकरण लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ते उफाळून आले. हे प्रकरण फार ताणू नये, यासाठी पैसे भरण्यासाठी बुधवारी धांदल सुरू झाली होती.

‘गोकुळ’च्या गडमुडशिंगी पशुखाद्य कारखान्यातून दूध संस्थांना वेगवेगळ्या वाहतूक संस्थांच्या माध्यमातून पशुखाद्याचा पुरवठा केला जातो. या संस्थेकडून विविध गावांतील दूध संस्थांना पशुखाद्याचा पुरवठा होतो. मात्र, प्रत्यक्षातील वाहतुकीचे अंतर व खर्ची टाकलेले अंतर यांमध्ये तफावत आढळली आहे. गेली अनेक महिने अशा प्रकारे वाहतूक यंत्रणेकडून लूट सुरू होती. अशा प्रकारे अंतर वाढवून सुमारे ३५ लाखांची लूट केल्याचे उघड झाले आहे.

हे प्रकरण उघड होताच, दोन कर्मचाऱ्यांना दोषी धरून सगळा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. खऱ्या मास्टरमाइंडला बाजूला करून कर्मचाऱ्यांवर प्रकरण ढकलल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांतील एका कर्मचाऱ्याने तर आत्महत्येची धमकी दिल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्याने हे प्रकरण मिटवण्यासाठी धडपड सुरू केली. पैसे भरतो; पण या प्रकरणाची वाच्यता कोठे करू नका, असा त्यांचा प्रयत्न आहे. बुधवारी वाहतूक संस्थेच्या नावाचा संबंधित रकमेचा धनादेश देण्यासाठी जुळवाजुळव सुरू होती.

या विभागातील कर्मचारी अनेक वर्षे एकाच ठिकाणी असल्याने त्यांना चांगलीच मुळे सुटली आहेत. एका अधिकाऱ्याने तर कोकणात शेकडो जमीन खरेदी केली असून, त्यांना पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने अशा अपहारांना खतपाणी मिळत आहे.

कच्चा माल खरेदीची तपासणी होणार का?

पशुखाद्य विभागात वाहतुकीमध्ये झालेला अपहार फार छोटा आहे. संघ व्यवस्थापनाने डोळे उघडून तपासणी केली तर हलक्या दर्जाचा कच्च्या मालाच्या आडून कशा पद्धतीने लुटले जाते, हे उघड होईल. तो घोटाळा यापेक्षा मोठा असेल, अशी चर्चा संघाच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

संचालक मंडळात अस्वस्थता

एकूणच कामकाजाबाबत संचालक मंडळात अस्वस्थता दिसते. नेत्यांना घाबरून काही संचालक तोंड उघडत नाहीत. आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा सपाटा गेल्या दोन-तीन महिन्यांत सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांसह संचालकांची अस्वस्थता वाढली आहे.

पशुखाद्य विभागातील अपहाराबाबत अद्याप मला काही माहिती नाही. मी प्रशिक्षणासाठी बाहेर आहे. – योगेश गोडबोले (कार्यकारी संचालक, गोकुळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here