एकच मिशन, शाहू छत्रपती यांची इलेक्शन; संभाजीराजेंची स्पष्टोक्ती

0
33

कोल्हापूर प्रतिनिधी -प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : शाहू छत्रपती हे माझे सर्वस्व आहे. त्यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे एवढे एकच उद्दिष्ट माझ्यासमोर आहे. त्यामुळे लोकसभेला राज्यभरात कुठेही ‘स्वराज्य’ संघटना लोकसभेची निवडणूक लढवणार नसून आमची सर्व ताकद कोल्हापुरात एकवटणार असल्याचे माजी खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी स्पष्ट केले.

येथील न्यू पॅलेसवरील कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. संभाजीराजे यांनी यावेळी सर्व चर्चांना पूर्णविराम देत केवळ शाहू छत्रपतींच्या विजयासाठी पडेल ते कष्ट करणार असल्याचे जाहीर केले.

संभाजीराजे म्हणाले, अजूनही महाविकास आघाडीकडून काही गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. परंतु, शाहू छत्रपती लोकसभेच्या रिंगणात असून, त्यांची आणि लोकांचीही इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे.

त्यांच्या विजयापुढे माझ्या सर्व आकांक्षा दुय्यम असून, आमचं घर किती एकसंध आहे हे दाखविण्यासाठीच नुकताच माझा आणि त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

ते म्हणाले, २००९ साली जे फटके खाल्लेत त्यातून बरेच काही मी शिकलो आहे. तसा प्रकार पुन्हा होणार नाही. एक अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्व म्हणून आम्ही शाहू छत्रपती यांच्याकडे पाहतो. ते दिल्ली गाजवतील, असा मला विश्वास आहे.

मी बोललो तर घोटाळा होईल

राजकारणात आरोप – प्रत्यारोप चालणार. परंतु, आमच्याकडेही शस्त्रे आहेत. मी दिल्ली पाहिलीय. त्यामुळे मी बोलायला सुरुवात केली तर घोटाळा होईल, अशा शब्दांत यावेळी त्यांनी विरोधकांना इशारा दिला.

मग, मोदींचे वय किती?

शाहू छत्रपती यांनी या वयात निवडणुकीला उभे राहायला नको होते, असे काही जण म्हणत आहेत. आमच्या वडिलांचे वय जे विचारतात त्यांना मोदींचे वय माहीत नाही का? महाराज पहिलवान आहेत. जोर, बैठका मारलेल्या आहेत. त्यांचा सामाजिक वावर कोल्हापूरने अनुभवला आहे. शिवाय मी, मालोजीराजे आम्ही आहोतच; आणि आता आमची मुलंही तयार झाली आहेत, असे रोखठोक उत्तर संभाजीराजेंनी दिले.

आम्ही नास्तिक नाही

शिवाजी आणि शाहू महाराजांनी नेहमी धर्माला पाठिंबा दिला होता. आम्ही काही नास्तिक नाही. त्यामुळे वेगळ्या दृष्टिकोनातून कोणी शाहू महाराजांना नेत असतील तर ते चुकीचे आहे. प्रागतिक विचार राष्ट्रभर गेला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. निवडणूक ही विकासकामांवर लढली पाहिजे, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here