कोल्हापूर : गेल्या काही महिन्यापासून शहरात भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली असताना त्यात भरीस भर म्हणून गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस एका माकडाने बागलचौक, शाहुपुरी, टाकाळा परिसरात अनेकांचा चावा घेत दहशत माजविली.
या संतापलेल्या माकडाला पकडण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांसह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागली. आठ तासांच्या थरारानंतर जवानांनी या माकडला जेरबंद केले.
गुरुवारी सायंकाळी बागल चौक येथील जयप्रकाश नारायण उद्यानात एक माकड आले. सुरवातीला त्याच्याकडे गम्मत म्हणून पाहात दुर्लक्ष केले. परंतू रात्री ते काही जणांच्या अंगावर धावून जायला लागले.
राजारामपुरी परिसरात नागरिकांच्या अंगावर धावून येत होते. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी महापालिका अग्निशमन दलास त्याची कल्पना दिली. रात्री एक वाहनासह काही जवान तेथे पोहचले. पण ते सापडले नाही. अंधारही पडल्याने त्याला पकडण्याची मोहिम थांबविण्यात आली.
शुक्रवारी सकाळी हे माकड साईक्स एक्स्टेशन परिसरात युवराज बालिगा यांना चावले. तसेच अन्य नागरिकांच्याही अंगावर धावून जायला लागले. त्यामुळे अग्निशमन दलाला पुन्हा फोन करण्यात आला.
यावेळी अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन त्या माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला. वन विभाग कर्मचाऱ्यांनाही त्याठिकाणी बोलावून घेण्यात आले. परंतू माकडाने साईक्स एक्स्टेश, टाकाळा परिसरात धुडगुस घालण्यास सुरवात केली. कधी झाडावर तर कधी इमारतींच्या टेरेसवर जाऊन बसायला लागल्याने त्याला पकडने अवघड होऊन बसले. साडेचार वाजेपर्यंत माकड पुढे आणि जवान, कर्मचारी मागे असा थरार सुरु होता.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला माकडाला अग्निशमन जवान व वन कर्मचाऱ्यांनी ट्रॅंग्युलायझरचे गनचा आवाज व जाळीच्या साह्याने या माकडाला पकडले.
यानंतर त्याला सुखरूप दाजीपूर अभयारण्यात सोडण्यासाठी नेण्यात आले. या मोहिमेत महानगरपालिका अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी जयवंत खोत वाहन चालक नवनाथ साबळे फायरमन प्रमोद मोरे व संभाजी ढेपले व वन विभागाचे अमोल चव्हाण, विनायक माळी, काटकर प्रदीप सुतार- पथक प्रमुख बांगी, तसेच माजी उपमहापौर संजय मोहिते व इचलकरंजी वन्य जीव संरक्षक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
पाच ते सहा जणांचा घेतला चावा
हे माकड पिसळलेले होते, असे काही नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसात त्याने पाच ते सहा नागरिकांचा चावा घेतला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.