कोल्हापूर : विमानतळावर टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासोबत काही वेळ चर्चा केली.
काही मिनिटांची ही भेट राजकीय चर्चेची ठरली.
मुख्यमंत्री शिंदे रविवारी विमानतळाच्या कार्यक्रमास आले असता यांनी शिवसेनेच्या खासदार, आमदार व अन्य नेतेमंडळींशी केलेली चर्चा लक्षवेधी ठरली. त्यानंतर शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. भिडे यांच्या सोबत काही वेळ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी चर्चा केली.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या जागा महायुतीत कोण लढणार? विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळणार का नवीन उमेदवार असेल? यासंदर्भात राजकीय चर्चा रंगल्या आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगलेपैकी एक जागा मिळावी असाही भाजपचा आग्रह आहे. तर शिवसेना दोन्ही जागांवर ठाम आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विमानतळावर झालेल्या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.
कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, राज्य नियोजन मंडळाचे राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यासोबत टर्मिनल इमारतीची पाहणी केली. इमारत पाहणी सुरू असताना पालकमंत्री मुश्रीफ हे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
पाहणीच्या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार प्रकाश आबिटकर कुठे आहेत, अशी विचारणा केली. टर्मिनल इमारतीमध्येच एका बाजूला मुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्वांसोबत काही वेळ चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे दिल्ली दौरे झाले, पण अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर गुप्त बैठकीत विशेष चर्चा झाल्याचे समजते.