विनापरवाना सभा घेतली म्हणून मनोज जरांगे पाटलांसह समन्वयकांविरोधात गुन्हा दाखल

0
54
Pune: विनापरवाना सभा घेतली म्हणून मनोज जरांगे पाटलांसह समन्वयकांविरोधात गुन्हा दाखल

मराठा आरक्षणासाठी जानेवारीमध्ये मुंबईच्या दिशेने उपोषणासाठी जात असताना वाघोलीत पहाटे सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना स्पिकर लाऊन, विनापरवाना सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्याने मनोज जरांगे पाटील यांच्यासह वाघोलीतील मराठा समन्वयकांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक रितेश काळे यांनी फिर्याद दिली असून जरांगे पाटील यांच्यासह गणेश म्हस्के, संदीप कांबीलकर, शेखर पाटील व इतर आठ ते दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने जात असताना २३ जानेवारी रोजी रात्री वाघोली येथील चोखी ढाणी रोडच्या मैदानावर मुक्काम होता. वाघोलीतील समन्वयकांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे परवानगीचा अर्ज केल्यानंतर पोलिसांकडून त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात जरांगे पाटील वाघोलीत पहाटे ४ वाजता पोहोचले आणि एक तासभर पहाटेची सभा झाली होती.

आयोजकांनी विनापरवाना स्पीकर लावून, विनापरवाना सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल दीड महिन्यानंतर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असून सरकार पोलिसावर दबाव टाकून मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन मोडीत काढत आहे. मात्र याची किंमत सरकारला मोजावीच लागेल. अधिक तीव्रतेने लोकशाही मार्गाने मराठा बांधव आरक्षणासाठी एकत्र त्यांची मागणी पूर्ण करून घेतील, अशी प्रतिक्रिया समन्वयक शनी शिंगारे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here