कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून भाजपकडून लोकसभा निवडणूकीसाठी मी इच्छूक नसल्याचे स्पष्टीकरण शाहूवाडी-पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे मंगळवारी लोकमतशी बोलताना केली. ही जागा लढवावी असा मला भाजपकडूनही प्रस्ताव आलेला नाही.
आणि दिल्लीच्या राजकारणात एवढ्या लवकर जाण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल मतदार संघात संपर्क कमी असल्याची नाराजी असल्याची चर्चा भाजपकडूनच सुरु झाली आहे. त्यामुळे त्यांना पर्याय म्हणून आमदार कोरे, भाजपच्या शौमिका महाडिक यांची नावे मुख्यत: चर्चेत आली आहेत. त्यामुळे याबाबत त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे समजून घेण्यासाठी लोकमतने त्यांच्याशी संपर्क साधला.
आमदार कोरे म्हणाले, जनसुराज्य पक्षाची भाजपसोबत राज्याच्या निवडणूकीत युती आहे हे खरे आहे परंतू आम्ही आमच्या पक्षाला एकही लोकसभेची जागा मागितलेली नाही. मुळातच माझीच लोकसभा लढवण्याची इच्छाच नाही. हातकणंगले लोकसभा मतदार संघात आमची चांगली ताकद आहे, संपर्क आहे. त्यामुळे कदाचित आमचे नाव चर्चेत आले असावे असे त्यांनी सांगितले.