कृष्णा नदीपलीकडे औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद या गावांमध्ये पिसाळलेला कोल्हा धुमाकूळ घालत असून, त्याने गेल्या चार दिवसांत या परिसरातील सात शेतकऱ्यांचा चावा घेऊन त्यांना गंभीर जखमी केले आहे.
यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या कोल्ह्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
औरवाड, गौरवाड परिसरात ऊस तोडणी सुरू असून शेतकरीवर्ग या कामात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत या परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपासून पिसाळलेला कोल्हा धुमाकूळ घालत असून, त्याने सात शेतकऱ्यांना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. या शेतकऱ्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
औरवाड येथील अशोक मंगसुळे व अमर जगताप या शेतकऱ्यांचा या कोल्ह्याने चावा घेतला असून, गौरवाड व कवठेगुलंद येथील अन्य पाच शेतकऱ्यांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला असता तो तिथून प्रसार झाला असलातरी या परिसरामध्ये त्याचा अजून वावर असल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊस तोडणी करण्यासाठी ऊस मजूरही शेतात जाण्यास यामुळे तयार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची ऊस तोडणी खोळंबली असून, शेतकऱ्यांबरोबर ऊसतोड मजुरांमध्येही या पिसाळलेल्या कोल्ह्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी बिबट्यासदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्याची घटना या परिसरात घडली होती. यानंतर आता पिसाळलेल्या कोल्ह्याने येथे धुमाकूळ घातल्यामुळे वनविभागाने या पिसाळलेल्या कोल्ह्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.