कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील शाळांची थकित देयके शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी विभागाने प्रलंबित ठेवली आहेत. ती प्रलंबित ठेवताना संबंधित शाळांना कळवलेले नाही. ठराविक मुदतीत ही देयके मंजूर केली नाहीत तर पुढील वर्षांपर्यत त्यासाठी थांबावे लागते.
लेखाधिकारी कार्यालयाकडून मुद्दामहून त्रुटी काढून ही देयके प्रलंबित ठेवली जात असल्याने महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीच्यावतीने मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ‘वेतन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
कोल्हापूर जिल्हा व विभागातील शाळांची थकित देयके लेखाधिकारी कार्यालयाकडे सादर केली जातात. ही देयके फेब्रुवारीपर्यंत मंजूर होणे गरजेचे आहे. अन्यथा, देयकासाठी पुढील वर्षभर वाट पाहवी लागते. मात्र, या कार्यालयाकडून वारंवार त्रुटी काढल्या जातात. याबाबत संबंधित शाळांना कळवले जात नाही. इतरांमार्फत आलेले देयके तत्काळ मंजूर केली जात आहेत. मग, आमचीच देयके का मंजूर करत नाही असा सवाल करत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, शिक्षक नेते दादा लाड, जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, सुभाष खामकर, अनिल ल्हायकर, शिवाजी खापणे, भानुदास गाडे, उत्तम जाधव, भाग्यश्री राणे, अभिजित आपटे, सावता माळी, शीतल जाधव, विनायक सपाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.