
राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के स्वातंत्र आरक्षण दिलं आहे. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तसेच सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
‘आज राज्य सरकार कॅबिनेटची बैठक घेणार असल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी अधिसूचनेची अंमबजावणी करावी, विनाकारण निवडणुकांची आचारसंहिता लावून अन्याय करू नये’ असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
‘विनाकारण निवडणुकांची आचारसंहिता लावून अन्याय करू नये, आज कॅबिनेटची बैठक आहे, त्यामध्ये अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रामाणपत्र तातडीनं द्यावं. काही, काही अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र दिले जात नाहीत.
राज्यभरात खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आहे. तुम्ही मराठा समाजाची नाराजी ओढून घेऊ नका, सगे सोयरे शब्दाची अमंलबजावणी करावी ही शेवटची विनंती.
लोक आता थांबणार नाहीत, विनाकारण नाराजीची लाट अंगावर घेऊ नये, अचारसंहिता लावा पण त्यापूर्वी कॅबिनेटच्या बैठकीत अध्यादेशाची अंमलबजावणी करा,’ असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सहा महिने झाले आंदोलन सुरु आहे, पण सरकार काही करत नाही. आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला नाही तर आम्ही पुन्हा बैठक घेणार. फडणवीसांच्या मनात मराठ्यांविषयी द्वेष आहे. आता महिलांवरती देखील गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मला बदनाम करायच्या भानगडीत पडू नका, प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार असतो. तुमच्या आमदारांनी केलेल्या भ्रष्टाचाराची यादी माझ्याकडे आहे’, मी मागे हटणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.


