गोकुळच्या सौ. सुप्रिया चव्हाण यांना “सर्वोत्तम महिला दूध उत्पादक – २०२५” पुरस्कार

0
11

गोव्यातील राष्ट्रीय दुग्ध परिसंवादात गौरव – गोकुळ परिवाराचा अभिमानाचा क्षण

कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
इंडियन डेअरी असोसिएशन (पश्चिम विभाग), गोवा डेअरी, सुमुल डेअरी आणि गोवा शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “गोव्यातील दुग्ध व्यवसायातील संधी आणि आव्हाने” या विषयावर राष्ट्रीय दुग्ध परिसंवादाचे आयोजन डोना पावला, गोवा येथील एन.आय.ओ. सभागृहात ७ ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले.

या राष्ट्रीय परिसंवादात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) च्या सौ. सुप्रिया अतिकांत चव्हाण (रा. टाकळीवाडी, ता. शिरोळ) यांना “महाराष्ट्रातील सर्वोत्तम महिला दूध उत्पादक – २०२५” हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सौ. चव्हाण या गोकुळच्या प्रगत आणि यशस्वी महिला दूध उत्पादक असून, त्यांच्या गाय, म्हैस आणि वासरे अशा एकूण ७६ जनावरांचा अत्याधुनिक पद्धतीचा गोठा आहे. त्या रेणुका दूध संस्थेच्या माध्यमातून दररोज सुमारे ३०० लिटर दूध गोकुळाला पुरवतात. दुग्धोत्पादनातील त्यांच्या आधुनिक दृष्टिकोन, स्वच्छता, दर्जा आणि नियमितता याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
🌿 उपस्थित मान्यवर आणि अभिनंदनपर संदेश

या परिसंवादाच्या उद्घाटन सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, पशुसंवर्धन मंत्री पराग नागरसेनकर, डॉ. आर. एस. सोधी, डॉ. जे. बी. प्रजापती, तसेच गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक डॉ. चेतन नरके, अनिल हातेकर, व कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले उपस्थित होते.

यावेळी मंत्री पराग नागरसेनकर यांनी म्हटले की, “गोकुळ दूध संघ हा देशातील एक अग्रगण्य सहकारी संघ असून, गोव्यातील दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी गोकुळचे मार्गदर्शन आणि सहकार्य अमूल्य ठरेल,” असे मत व्यक्त केले.
गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “गोकुळ दूध संघाने नेहमीच विविध राज्यांतील दूध उत्पादकांना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिले आहे. गोव्यात गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ अधिक प्रमाणात उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सौ. सुप्रिया चव्हाण यांना मिळालेला पुरस्कार हा केवळ त्यांच्या मेहनतीचा सन्मान नसून गोकुळ परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या कार्यातून अनेक महिला शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल,” असे त्यांनी नमूद केले.
🎓 परिसंवादाचे ठळक मुद्दे

या दोन दिवसीय परिसंवादात डिजिटलायझेशन, स्मार्ट डेअरी फार्मिंग, खाद्य व चारा व्यवस्थापन, दूध प्रक्रिया, विपणन आणि पोषण या विषयांवर तज्ज्ञांनी सखोल चर्चा केली. परिसंवादातून गोव्यातील दुग्ध व्यवसायातील संधी व आव्हानांवर विधायक विचारमंथन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here