
राधानगरी प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर शहरातील अनेक चोरींचा उलगडा कोल्हापूर शहर व परिसरात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राधानगरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १३ चोरीच्या मोटारसायकलींसह ₹२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी युवराज उर्फ विनायक साताप्पा कांबळे (वय ३६, रा. नरतवडे, ता. राधानगरी) या संशयित चोरट्याला अटक करण्यात आली आहे.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार साहो, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार साहो व उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.गुप्त माहितीवरून सापळाराधानगरी ट्रॅफिक पोलिस अंमलदार रणधीर वरोटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून राधानगरी पोलिसांनी तत्काळ तपास पथक तयार केले. या पथकात सहाय्यक फौजदार पारळे, पोहेकॉ खामकर, शेळके, पोलीस शिपाई वरोटे, पोवार, पाटील, गुरव, किरण पाटील, भोपळे, बरगे आणि चालक गुरव यांचा समावेश होता.सदर पथकाने आरोपी विनायक कांबळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याच्याकडून कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणांहून चोरी करण्यात आलेल्या अनेक मोटारसायकली हस्तगत करण्यात यश आले. या गाड्यांपैकी काहींचे चोरीचे गुन्हे आधीच जुना राजवाडा पोलीस ठाणे (४ गुन्हे) व शाहुपुरी पोलीस ठाणे (४ गुन्हे) येथे नोंद असल्याचे समोर आले आहे. उर्वरित पाच वाहनांची नोंदणी माहिती अपूर्ण असून त्या वाहनांच्या मूळ मालकांचा शोध सुरु आहे.चोरीच्या वाहनांची यादीजप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये प्रामुख्याने हिरो होंडा स्प्लेंडर, स्प्लेंडर प्लस, फॅशन प्रो, सुपर स्प्लेंडर अशा विविध प्रकारच्या मोटारसायकलींचा समावेश आहे. बहुतेक गाड्या काळ्या रंगाच्या असून काहींवर लाल-निळे पट्टे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्व गाड्यांचे इंजिन व चेसिस नंबर तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यानुसार संबंधित वाहन मालकांना संपर्क साधून ताबा देण्यात येणार आहे.शहरातील चोरींमागचा मास्टरमाइंड उघडकीसप्राथमिक चौकशीत आरोपी विनायक कांबळे याने कोल्हापूर शहरातील विविध भागांतील वाहनतळांमधून, रस्त्यांवरील वसाहतीतून आणि घरांसमोरून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. आरोपीवर मोटारसायकल चोरीचे एकूण आठ गुन्हे नोंदवलेले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो शहरात येऊन गाड्या चोरत असे आणि राधानगरी भागात ठेवून विक्रीसाठी ग्राहक शोधत असे.वाहन मालकांना आवाहनपोलिसांनी या प्रकरणात जप्त केलेल्या वाहनांचे इंजिन व चेसिस नंबर तपासून वाहन मालकांनी राधानगरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. संबंधित वाहन मालकांनी आपले आवश्यक कागदपत्रे घेऊन थेट संपर्क साधावा, असेही पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी सांगितले.पोलिस दलाचे कौतुकही यशस्वी कारवाई राधानगरी पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे. पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून शहरातील चोरींचा मोठा उलगडा केला आहे. या कारवाईमुळे राधानगरी परिसरातच नव्हे तर कोल्हापूर शहरातही वाहनचोरांमध्ये खळबळ उडाली आहे.📞 संपर्क :राधानगरी पोलिस ठाणे – ०२३२१-२३४०३३पोनि. संतोष गोरे – ८९७५५०५९००➡️ “राधानगरी पोलिसांची जबरदस्त कारवाई – वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या, नागरिकांत समाधानाचा श्वास!”

