प्रतिनिधी प्रदीप अवघडे
गारगोटीतील जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी गायरान जमिनीतील जागा मिळावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या जागेच्या हस्तांतर नस्तीवर सही करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी १० लाख रुपयाची मागणी केली आहे, असा आरोप भाजपाचे जिल्हा सदस्य नाथाजी पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी हा प्रश्न आठ दिवसांमध्ये मार्गी न लावल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.गारगोटीत जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात असून वितरण नलिकाअंतर्गत नळ जोडणी, चार लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ आदी ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पासाठी गट क्रमांक २३५ मध्ये वीस गुंठे जागा मिळावी, अशी मागणी दीड वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या मागणीची फाईल अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे प्रलंबित आहे. पालकमंत्र्यांनी ही जागा लवकर हस्तांतरित करावी, अशी सूचना त्यांना दिली आहे.जागा हस्तांतरित करण्यामध्ये शिंदे यांनी टाळाटाळ चालवली असून त्यांनी यासाठी १० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप नाथाजी पाटील यांनी केला. याबाबत महसूल मंत्र्यांकडे तक्रार केल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी माजी उपसरपंच सचिन देसाई, ग्रामपंचायत सदस्य राहुल चौगुले, राहुल जाधव, प्रा. धनाजी तोरस्कर उपस्थित होते. *माहिती तंत्रज्ञान बातम्या*