प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर: गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण अस्थिरतेच्या वळणावर गेले आहे. त्यामुळे राजकीय डावपेच सतत बदलताना दिसत आहेत आणि डावपेच बदलले की राजकीय समीकरणे सुद्धा बदलतात. अशा वातावरणात इकडून तिकडे आणि तिकडून इकडे आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती निर्माण होते. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय मंचावर सध्या असेच घडताना दिसते आहे. पक्षनिष्ठा बाजूला ठेवून अनेक जण सत्तानिष्ठ बनतं आहेत.राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघाचे कधी राधानगरी कडे तर कधी भुदरगडकडे विधानसभेचे प्रतिनिधित्व आले आहे. के पी पाटील हे २००४ आणि २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेवर सलग दोन वेळा निवडून गेले होते. त्यांची हॅट्रिक प्रकाश आबीटकर यांनी खंडित केली आहे. आणि आता विद्यमान आमदार प्रकाश अबिटकर यांना या मतदारसंघातून निवडून येऊन हॅट्रिक करावयाची आहे. के पी पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. गेल्या काही महिन्यापुर्वी त्यांनी बिद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकली आहे.राधानगरी भुदरगड आजरा हा मतदारसंघ एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार आहे. महायुतीचे उमेदवार प्रकाश अबिटकर हे असणार आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीकडे जाण्याचा एकमेव पर्याय के पी पाटील यांच्याकडे होता आणि आता तो त्यांनी स्वीकारला आहे. लवकरच ते मुंबईत मातोश्री वर जाऊन शिवबंधन बांधून घेणार आहेत. तसे त्यांनी बोलूनही दाखवले आहे.या मतदारसंघातून के पी यांचे मेहुणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष ए वाय पाटील हे सुद्धा इच्छुक होते आणि आहेत. पण त्यांच्यासमोर मजबूत राजकीय पक्षाचा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे ते या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत किंवा नाहीत हे अद्याप स्पष्ट नाही. राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी हे दोन पर्याय त्यांच्यासमोर आहेत.उद्धव ठाकरे हे निवडून येण्याची पात्रता असलेल्या उमेदवारांच्या शोधात होते. त्यांना प्रकाश अबिटकर यांचा पराभव करावयाचा आहे आणि म्हणूनच त्यांनी दोन वेळा आमदारकी भोगलेल्या के पी पाटील यांना भेटण्यासाठी बोलावले आहे. आमदारकी पासून सलग दहा वर्षे बाजूला असलेल्या के पी पाटील यांना पुन्हा विधानसभेवर जायचे आहे. बिद्री सहकारी साखर कारखान्याची नुकतीच झालेली निवडणूक ही त्यांच्यासाठी विधानसभेची रंगीत तालीम होती. ही निवडणूक त्यांनी जिंकली आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणात, त्यांना त्यांचे नेते हसन मुश्रीफ यांची साथ सोडावी लागली आहे. आणि आता ते या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत.ए वाय पाटील हे सुद्धा महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनाही उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी हवी होती. तथापि दहा वर्षे आमदार असलेले आणि साखर कारखाना ताब्यात असलेले के पी पाटील यांना उद्धव ठाकरे गटाने पसंती दिली आहे. निवडून येण्याची के पी पाटील यांची पात्रता पाहूनच ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर येण्याचे आग्रहाचे निमंत्रण त्यांना दिल आहे.
Home Uncategorized के.पी.पाटील घेणार ठाकरेंची मशाल हाती ;लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेची घेणार भेट