प्रतिनिधी शाहूवाडी भेडसगाव: अमर पाटील
शाहूवाडी /भेडसगाव: १ मे १९४० रोजी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आनंदराव पाटील (तात्या)यांचा जन्म झाला. घरची जेमतेम परिस्थिती असताना काबाडकष्ट करून, शेतीभातीतील काम करून त्यांनी स्वतःला घडवलं. प्राथमिक शिक्षण भेडसगावच्या प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण माणिकवाडी ता. वाळवा तर पदवीचे शिक्षण इस्लामपूर येथे पूर्ण केले.७ भाऊ,१ बहीण,मोठी भावकी,गाव,जोडलेला विशाल जनसागर असा समृद्ध परिवार आणि जोडलेला समृद्ध गोतावळा अशा ऋणानुबंधाच्या सहवासात तात्यांची जडणघडण झाली.लोक त्यांना ‘तात्या’ या टोपणनावाने ओळखत.पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर आपल्या नोकरीची सुरुवात आंबा ता शाहूवाडी येथील आश्रमशाळेतून शिक्षक म्हणून सेवेचा आरंभ केला.ही नोकरी अर्धवट सोडून पुन्हा ते रेल्वे पोलीस म्हणून रुजू झाले. सामाजिक कार्याच्या संस्कारपिंडामुळे त्यांचे नोकरीत मन रमले नाही. आणि आपसूक ते राजकारणात आले.शेकाप पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या शाहूवाडी मतदारसंघात तत्कालीन त्यांचे सहकारी सदा पाटील (चरणकर), के. के. पाटील (तुरुकवाडी), दादासाहेब पाटील (रेठरेकर) या मित्रपरिवाराच्या साथीने शेकाप पक्षात काम केले. तालुक्यात शेकाप पक्षाची बांधणी करण्यामध्ये तात्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते.उत्तम संघटक,कार्यकर्ता, अमोघ वक्तृत्व असणारा हा युवक काँग्रेसचे दिवंगत खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या सान्निध्यात आला. गायकवाड यांच्याशी सहवास आल्यामुळे त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.
प्रचारप्रमुख,उत्तम नियोजक, सर्व निवडणुकांच्या जोडण्या लावणे असे कौशल्य सिद्ध करत ते काँग्रेसपक्षाच्या विचारधारेशी एकरूप झाले. आणि इथेच गायकवाड साहेबांचा विश्वास त्यांनी संपादन केला.गायकवाड साहेबाच्या बरोबर २५ वर्षे त्यांनी सक्रियपणे राजकारण- समाजकारण केले.गायकवाड साहेबांच्या आशीर्वादामुळे त्यांची गोकुळ मध्ये एन्ट्री झाली. हीच त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा क्षण ठरला,यापासून त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. गावगाड्यातील माणसांचा कल ओळखून शेतीला पूरक व्यवसाय असणाऱ्या दुग्धोत्पादन व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. गावोगावी दुध संस्थांची निर्मिती केली.गोकुळ दूध संस्थेची संलग्न असणाऱ्या या संस्था गोकुळ परिवाराशी कायमपणे जोडल्या.तालुक्यात,जिल्ह्यात दूध संस्थांचे जाळे निर्माण केले.गोकुळ मध्ये संचालक म्हणून कार्यरत असताना उखळू, कांडवण या दुर्गम भागातून दूध संकलनास वेळ होतो.दूध वासात बाहेर काढले जाते, ही बाब जेव्हा तात्यांच्या लक्षात आली, तेव्हा गोकुळच्या नियम- अटी -शर्तीत ‘शीतकरण’ केंद्र बसत नसतानाही त्यांनी खास बाब म्हणून गोगवे दूध शीतकरण केंद्राची निर्मिती केली.
आज या केंद्राचे संकलन सव्वा लाख लिटर च्या वरती आहे.अनेक युवकांना या ठिकाणी १ रुपया न घेता नोकऱ्या दिल्या. अनेकांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि आनंद निर्माण करण्यासाठी हा ‘आनंदवन’ नेहमीच राबत राहिला, कष्टत राहिला.कोल्हापूरच्या दवाखान्यात गावातील एका गरीब कुटुंबातला सामान्य व्यक्ती आजारी असल्याचे आनंदराव पाटील (तात्या)ना समजले. क्षणाचाही विलंब न लावता तात्या आंब्यातून कोल्हापुरातील त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरला भेटून त्या रुग्णाच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचा जीव वाचवण्यासाठी काहीही करा,पैशाची काळजी करू नका.असा आधार देत दवाखान्याचे सर्व बिल भरून, त्याच्या व सोबत असणाऱ्यांच्या राहण्या खाण्याची सोय करून कोणताही गाजावाजा न करता तात्या घरी परतले. चार दिवसांनी त्या पेशंटला दवाखान्यातुन घरी आणले,पेशंट सुखरूप घरी आले. जीवदान मिळाले. अगदी मृत्यूशयेवर असणारा तो रुग्ण बरा होऊन घरी आला. जेमतेम परिस्थिती असणाऱ्या त्या रुग्णाने दवाखान्याचे बिल भागवण्यासाठी आपली शेती विकण्याचा निर्णय घेतला होता, पण तात्या नावाचा ‘देव माणूस’ प्रसंगाला उभा राहिला आणि पोटापुरती कसायला असणारी जमीन शाबूत राहिली.गावातील डी.एड, बी.एड झालेल्या अनेकांना त्यावेळी गावात असणाऱ्या शैक्षणिक संस्थेने नोकरीसाठी नाकारले, म्हणून गावामध्ये मुलांच्या माध्यमिक शिक्षणाचीही सोय होईल आणि गावातल्या कित्येक शिकलेल्या डी.एड, बी.एड बेरोजगार युवकांना नोकरीची संधी मिळेल या उदात्त,निरपेक्ष भावनेने ‘तात्या’ नावाच्या अवलियाने गावात हायस्कूल काढले.अनेकांना नोकऱ्या लागल्या,गावातच हायस्कूल शिक्षणाची सोय झाली.
या संस्थेतून शिक्षण घेत अनेक विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवले आहे,कोण अधिकारी, कोण डॉक्टर, इंजिनिअर तर कोण शिक्षक, राज्य शासनाच्या सेवेत आहेत.श्रावण महिना आला की गावातल्या आया बहिणींना तात्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते. श्रावण महिन्यातल्या सोमवारी स्वतःचा खर्च घालून तात्या अनेक प्रेक्षणीय ठिकाणी, पर्यटनस्थळी गावातील महिलांची सहल घडवून आणायचे. सर्वसामान्य- शेतकरी कुटुंबातल्या महिलांच्या जीवनामध्ये सहल- फिरण्याचा आनंद कुठून मिळणार? म्हणून तात्यांनी ही भावना ओळखून अनेक माता-भगिनींच्या चेहऱ्यावरचे आनंद आणि समाधान पाहिले,तात्या कृतार्थ झाले. गावातील तमाम माता- भगिनींच्या चेहऱ्यावचे संचित सुख व आशीर्वाद तात्यांनी जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत मिळवला.
गावामध्ये ,परिसरामध्ये- तालुक्यामध्ये संघटन बांधण्यामध्ये या अवलियाचे कसब निराळेच. गावातील प्राथमिक शिक्षक ,दुसऱ्या फळीतील नेतेमंडळी यांना एकत्रित करून “मर्द मराठा दख्खनच्या या ऐतिहासिक नाटकासाठी सर्वतोपरी मदत केली. कोल्हापूरहून रेफ्रि,स्टेज, साऊंड व इतर सर्व साहित्य पुरवले.या सर्व गोष्टी स्वतः पदरमोड करून पुरवल्या.या दिव्यत्वातून साकारले भेडसगावच्या कलाकारांची कलाकृती असलेले ऐतिहासिक नाटक “मर्द मराठा दख्खनचा” या नाटकाने अनेक प्रयोग केले.भागातील लोकांचे मनोरंजन केले.कलेला पाठबळ देणारा हा लोकप्रतिनिधी ‘विरळाच’!भेडसगाव या आपल्या जन्मगावामध्ये ‘मदर पीएचसी’ असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यामध्ये तात्यांचे योगदान अमूल्य होते.त्यांच्या प्रयत्नाने गावात आरोग्य केंद्र सुरू झाले आणि शाहुवाडीच्या उत्तर भागातील लोकांची सोय झाली.’तात्या’ नेतृत्व करत असतानाच्या कारकिर्दीमध्ये गावातील शिवकालीन ‘भवानी’ तलावाचा गाळ काढण्याचा प्रयत्न झाला होता. आनंद माध्यमिक विद्यालय, आनंद प्राथमिक आश्रमशाळा, सेवा संस्था, दूध संस्था,तरुण मंडळे, नाटक मंडळ,तालीम स्थापनेमध्ये तात्यांनी नेहमीच पाठबळ दिले,पुढाकार घेतला.आनंदराव पाटील म्हणजे भेडसगावच्या समृद्ध घरातील आनंदवन. हे आनंदवन आज हयात असते तर गावात अनेक गोरगरिबांच्या, सर्वसामान्यांच्या मुलांना नोकरी- रोजगार- व्यवसाय मिळाला असता.कित्येकांचे संसार उभे राहिले असते. गावामध्ये उच्चशिक्षणाची, विविध अभ्यासक्रमाची निर्मिती झाली असती.,लोकांची आर्थिक गरज भागली असती.कुणाला दवाखाना तर कुणाला शासकीय, अशासकीय कामासाठीं शब्द टाकण्याची जागा राहिली असती.पण एवढे मात्र नक्की त्यांना जाऊन २१ वर्षे लोटली,पण ‘तात्या’ नावाचे व्यक्तिमत्त्व आजही जनमाणसांच्या मनात,तोंडात,ओठात रुंजी घालून आहे.