
प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २०२२-२३ या ऊस तोडणी गळीत हंगामातील तुटलेल्या उसास प्रतिटन ४०० रूपयाचा दुसरा हप्ता मिळावा याकरिता पुणे-बंगळूर महामार्ग रोखून आंदोलन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने प्रतिटन १०० रूपयाचा तोडगा काढून आंदोलन स्थगित करण्यात आले.दरम्यान जवळपास दहा महिने झाले तरीही सरकारकडून या प्रस्तावाला मान्यता न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फ आज २५ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यपाल राधाकृष्णन यांच्या दौऱ्यावेळी निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत.सांगली सह कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता मान्यतेसाठी साखर आयुक्तांमार्फत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुख्य सचिवांकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. आजअखेर जवळपास दहा महिने होवूनही मुख्य सचिवांकडून याबाबत कोणतीच अमलबजावणी झाली नाही. याबाबत जवळपास सहावेळा मुख्य सचिव व चार वेळा मुख्यमंत्र्यांना याबाबत समक्ष भेटूनही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.महापूर व महागाईमुळे शेतकरी मेटाकुठीस आला आहे. यामुळे मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्या अकार्यक्षमतेचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्यपाल राधाकृष्णन यांच्यासमोर निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले.