प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर, दि.25 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल सिटीझन अॅप (CVIGIL) विकसित केले आहे. या अॅपवर दाखल होणाऱ्या तक्रारीवर 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.
आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल अॅप विकसित केले आहे. या मोबाईल अॅपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सी व्हिजिल अॅपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.
सी व्हिजिल अॅप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी वापरकर्त्यांनी फक्त अॅप उघडणे उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. अॅप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.
वैशिष्ट्ये
सी व्हिजिल अँप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.
वापर कसा करायचा
एन्ड्रॉईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील अँप स्टोर या अँपमध्ये जावून सी व्हिजिल (CVIGIL) सर्च करावे. त्यानंतर अँप डाऊनलोड करा. त्यानंतर अँप उघडून मोबाईल क्रमांक पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडिओसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.
अचूक कृती व देखरेख
या अँप्लिकेशनचा वापर करून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सी व्हिजिल अँप जिल्हा नियंत्रण कक्ष निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.
लाईव्ह फोटो, व्हिडिओ
या अँपच्या अचूकतेसाठी अँपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हीडिओ घेतले जातात, जेणेकरुन भरारी पथक स्थिर संनिरीक्षण चमुना (टीम) वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.
तातडीने होते कारवाई
या ॲपवर तक्रार दाखल होताच स्थानिक निवडणूक यंत्रणा तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य
ती कारवाई करेल.
डाटा सुरक्षा
या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.