- निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले
कोल्हापूर, दि.9 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 करीता उद्योग, उर्जा व कामगार विभागा अंतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने या व्यवसायाशी निगडीत कामगारांना मतदानाचा हक्क बजवण्याकरीता दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. मतदारांना मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्यास मतदान करता आले नाही, तसेच याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनेविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे निर्देश 279-इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी दिले.
इचलकरंजी उपविभागातील विविध असोसिएशन्सच्या अधिनस्त सदस्य आस्थापनांमधील मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस इचलकरंजी सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे, सरकारी कामगार अधिकारी राहुल तोडकर, मुख्य लेखापरीक्षक तथा स्वीप समितीच्या नोडल अधिकारी आरती खोत, एम.आय.डी.सी. पॉवरलुम, प्रोसेसिंग, सायझींग, पेट्रोलपंप, मेडीकल, बांधकाम क्षेत्र, हॉटेल इत्यादी असोसिएशन्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीत 100 टक्के मतदान करणे अपेक्षित आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी उपविभागात निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी साप्ताहिक सुट्टी रद्द करुन देण्यात येऊ नये, अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासाची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत त्यांना जिल्हा निवडणुक अधिकारी, कोल्हापूर यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकाने घेणे आवश्यक राहील.
उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकानांनी निवडणूकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी कामगारांना भर पगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, इचलकरंजी, गेट नं.2, राजाराम स्टेडियम, बस स्थानक समोर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे दुरुध्वनी क्रमांक 0230-2421391 आणि ईमेल आयडी aclichalkaranji@gmail.com या ठिकाणी तक्रार दाखल करावी, असे आवाहन 279-इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी केले आहे.