केंद्रीय संचार ब्युरो आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे कोल्हापूर मध्ये ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या जिल्हास्तरीय मतदान जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ

0
166

कोल्हापूर जिल्हा मतदान टक्केवारीत राज्यात अव्वल येण्यासाठी हिरीरीने मतदान करा -जिल्हाधिकारी अमोल येडगे

शंभर टक्के मतदारांनी मतदान करून मतदान टक्केवारीत कोल्हापूरला राज्यात अग्रक्रमावर न्यावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. निवडणूक आयोग आणि भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो कार्यालयातर्फे कोल्हापूर मध्ये मतदार जागृती अभियानाची आज सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी शाहीर रंगराव पाटील यांच्या कला पथकाने आपल्या पोवाड्याद्वारे उपस्थितांना खिळवून ठेवले.

याप्रसंगी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी उपस्थितांना मतदार प्रतिज्ञा दिली.

20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे.राज्यातील प्रत्येक मतदार नागरिकांनी न चुकता मतदान करावे, यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये प्रचाररथाद्वारे मतदारांना अवश्य मतदान करण्याविषयी प्रोत्साहित करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे; मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राची माहिती कुठून मिळवायची, आचारसंहिता नियम, आचारसंहितेचे उल्लंघन होताना दिसल्यास कुठे तक्रार करायची, अशी सर्व माहिती या प्रचार रथावर दृकश्राव्य माध्यमातून देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्रातील कलावंत, खेळाडू यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मतदारांना केलेले आवाहन एलइडी स्क्रिनच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात राज्य सरासरीपेक्षा मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागामधून हे प्रचार वाहन प्रवास करेल. केंद्रीय संचार ब्युरोचे लोककलावंत देखील लोककलेच्या माध्यमातून मतदारांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतील. हा उपक्रम दिनांक 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सुरू राहील. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाचे सहकार्य मिळत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here