कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : सोशल मीडियात ‘हवा’ निर्माण करण्याच्या उद्देशाने हसूर दुमाला (ता. करवीर) येथील छत्रपती शिवाजी चौकात १० ते १२ तरुणांनी शस्त्रे नाचवून व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करून काही काळ हवा केली.
पण, या स्टंटबद्दल गुन्हा दाखल होताच तरुणांना पोलिस कोठडीची हवा खावी लागली. शनिवारी (दि. २६) रात्री आठच्या सुमारास घडलेल्या प्रकारात करवीर पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
गावातील छत्रपती शिवाजी चौकात शनिवारी रात्री एक कार आणि काही दुचाकी पोहोचल्या. भर चौकात एकत्र आलेल्या तरुणांनी त्यांच्याकडील तलवारी, कोयते, चाकू, लोखंडी पाइप, काठ्या नाचवत घोषणाबाजी केली. सुमारे अर्धा तास त्यांचे फोटो सेशन आणि चित्रीकरण सुरू होते.
हा सर्व प्रकार समजताच करवीर पोलिस हसूर दुमाला येथे पोहोचले.
मात्र, तोपर्यंत तरुण निघून गेले होते. माहिती घेतली असता आसपासच्या गावांमधून आलेल्या काही तरुणांनी चौकात शस्त्रे नाचवत स्टंट केल्याचे पोलिसांना समजले. याबाबत पोलिस पाटील साताप्पा ज्ञानदेव परीट (वय ६०, रा. कुंभार गल्ली, हसूर दुमाला) यांनी फिर्याद दिली.
त्यानुसार पोलिसांनी नऊ जणांवर सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचा गैरवापर करणे, दहशत माजवणे, हुल्लडबाजी करण्याचा गुन्हा दाखल करून त्यांना रविवारी अटक केली. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
न्यायालयात हजर केले असता, संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. पोलिसांनी गुन्ह्यातील कार आणि शस्त्रे जप्त केली.
यांना झाली अटक
राहुल विष्णू पोवार (वय ३०, रा. हसूर दुमाला), अक्षय शेखर बागडी (वय २८, रा. कसबा बावडा, कोल्हापूर), आदित्य बजरंग गोसावी (वय २०, रा. शिये, ता. करवीर), करण राजेश फाळके (वय २०), रोहन विजय गायकवाड (दोघे रा. कनाननगर, कोल्हापूर), ऋतुराज कृष्णात चौगुले (वय २२, रा. कुरुकली, ता. करवीर), नागेश पाटील आणि सूरज राजेश वरुटे (वय ४३ दोघे रा. म्हालसवडे, ता. करवीर) यांना अटक झाली असून, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली. अल्पवयीन संशयिताला बालसुधारगृहात पाठवण्यात आले.
व्हिडीओ केला व्हायरल
भर चौकात शस्त्रे नाचवण्याचे व्हिडीओ तयार करून ते तरुणांनी सोशल मीडियात व्हायरल केले. चिथावणी देणारे व्हिडीओ सोशल मीडियातून डिलिट केले जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.