पिपाणी चिन्हामुळे तुतारीचे वाजले बारा, चिन्हाच्या घोळामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ९ उमेदवार पराभूत

0
171

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल हाती आले आहेत. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचंच सरकार आलं आहे. राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला सर्वात कमी जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला १६, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला २०, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १० जागा मिळाल्या. तर भाजपला १३२, शिवसेना शिंदे गटाला ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला ४१ जागा मिळाल्या. राज्यात आणि महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. तर महाविकास आघाडीत ठाकरे गट सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिन्हाच्या घोळाचा या निवडणुकीतही शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार नऊ ठिकाणी पडल्याचं दिसून आलं आहे.पिपाणी आणि तुतारी या चिन्हांमध्ये मतदारांचा घोळ झाला. त्यामुळे जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव पारनेर, केज, परांडा या नऊ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार पडले. विशेष म्हणजे या उमेदवारांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला, त्यापेक्षा जास्त मते पिपाणीला मिळाली आहेत. यावरून मतदारांनी पिपाणीलाच तुतारी समजून मतदान केल्याचं दिसून आलं आहे. हा घोळ झाला नसता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदारांची संख्या नऊने वाढली असतीजिंतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विजय भांबळे उभे होते. त्यांचा ४५१६ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणीला ७४३० मते मिळाली. त्यामुळे भाजपच्या मेघना बोर्डिकर या विजयी झाल्या.घनसावंगीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेश टोपे हे २३०९ मतांनी पराभूत झाले. या ठिकाणी पिपाणीला ४८३० मते मिळाली.शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उढाण हे विजयी झाले.शरद पवार गटाकडून शहापूरमधून लढणारे पांडुरंग बरोरा यांनाही फटका बसला. बरोरा यांचा १६७२ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणीला ३८९२ मते मिळाली. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे दौलत दरोडा हे विजयी झाले.बेलापूरमध्येही अटीतटीची लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप नाईक यांचा अवघ्या ३७७ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणीला २८६० मते पडली. त्यामुळे भाजपच्या मंदा म्हात्रे या विजयी झाल्या.अणुशक्तीनगरमध्येही टफफाईट झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे फहाद अहमद यांचा ३३७८ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणीला ४०७५ मते मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या सना मलिक विजयी झाल्या.आंबेगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांना पिपाणीचा फटका बसला. देवदत्त निकम यांचा १५२३ मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणीला २९६५ मते मिळाली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे दिलीप वळसे पाटील विजयी झाले.पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या राणी लंके यांचा पराभव झाला. राणी लंके यांचा १५२६ मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात पिपाणीला ३५८२ मते मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे काशिनाथ दाते विजयी झाले.केजमध्येही पिपाणीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा फटका बसला. पृथ्वीराज साठे यांचा २६८७मतांनी पराभव झाला. या ठिकाणी पिपाणीला ३५५९ मते मिळाली. या ठिकाणी भाजपच्या नमिता मुंदडा विजयी झाल्या.परांडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राहुल मोटे यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांना अवघ्या १५०९ मतांनी पराभूत व्हावं लागलं. या ठिकाणी पिपाणीला ४४४६ मते मिळाली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटांचे तानाजी सावंत यांचा विजय सोपा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here