प्रतिनिधी मेघा पाटील
आज दुपारी आम्ही सीपीआर रुग्णालयात आलो असता, तपासणीसाठी बाहेरील खाजगी लॅबचे प्रतिनिधी रुग्णांकडून पैसे वसूल करत असल्याचे निदर्शनास आले. अपघात विभागातील पाच-सहा रुग्णांकडून संबंधित प्रतिनिधीने रक्ताचे नमुने घेतले आणि त्यांच्याकडून रोख रक्कम वसूल केली.
त्या वेळी उपस्थित डॉक्टरांना विचारले असता, “तपासणी सीपीआरमध्ये का होत नाही?” असा सवाल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवले, मात्र दुपारी हा एजंट रूपेश पाटील यांच्या जाब विचारल्यानंतर सीपीआरमधून पळून गेला.
सायंकाळी पुन्हा तो एजंट सीपीआर परिसरात दिसल्याने त्याला पकडून सीपीआर प्रशासनाकडे सोपवले. डॉक्टर मिरगुंडे यांनी त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, सीपीआरमधील अनेक डॉक्टर त्या एजंटला फोन करून रुग्ण तपासणीसाठी बोलवत असल्याचे उघड झाले.
सीपीआर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित एजंट आणि त्याच्याशी संपर्कात असलेल्या डॉक्टरांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.
ही घटना खाजगी एजंट व सीपीआरमधील काही डॉक्टरांच्या संगनमताने रुग्णांची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट करते. दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा आहे.