मुंबई : विरोधक आणि सत्ताधाऱी पक्षांचे भाजप नेते आमदार सुरेश धस यांनी आरोपांची राळ उठवल्यानंतर चहूबाजूंनी कोंडीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याची माहिती आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार हे तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. दोघांमध्ये सागर बंगल्यावर २५ मिनिटे चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरील निर्णय राखून ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आवादा कंपनीच्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याने तसेच खंडणीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली होती. जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. मात्र धनंजय मुंडे यांनी सोमवार दि ६ जानेवारी सायंकाळी अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपविल्याची माहिती मिळत आहे.विरोधक आणि महत्त्वाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपामुळे मी व्यथित झालो आहे, असे नमूद करून धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे २५ मिनिटे चर्चा झाली. चर्चेअंती राजीनामयासंदर्भातील निर्णय राखून ठेवल्याची माहिती आहे. दरम्यान, मंत्रालयातील सागर बंगल्यावरील बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून तडक निघून जाणे पसंत केले.
Home Uncategorized धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती