प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा रत्नागिरी : बांगला देशी रोहिंगे भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी आले आहेत. एकाही बांगला देशीला महाराष्ट्रात थारा दिला जाणार नाही. त्यांना कोणी आश्रय देण्याचा प्रयत्न केलाच, तर बांगला देशी नागरिकांसह आश्रय देणाऱ्यांनाही बांगला देशात पाठवून देऊ, असा इशारा बंदरे, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.बंदर, मत्स्य व्यवसाय मंत्रालयाने मासेमारी संदर्भात जी नियमावली तयार केली आहे, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांची आहे. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यास एलईडी मासेमारीसह परराज्यातील मच्छीमारांची आपल्या हद्दीत घुसण्याची हिंमत होणार नाही. आता मी मंत्री आहे, याचे भान अधिकाऱ्यांनी ठेवले पाहिजे. किनारपट्टीवरील बंदरांमध्ये कोणत्या अवैध कारवाया चालतात, याची माहिती आपण संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यांनी त्या कारवाया तत्काळ रोखाव्यात, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.सोमवारी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे बंदरे, मत्स्य व्यवसाय, पत्तन, कस्टम, पोलीस, महसूल आदी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. आढावा बैठकीनंतर नितेश राणे यांनी आपल्या विभागाची भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. मत्स्य उत्पादनात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे मत्स्य उत्पादन वाढण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.आपण कट्टर हिंदुवादी आहोत याबद्दल प्रश्नच नाही. परंतु भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला मानणारा जो मुस्लीम आहे, जो भारताच्या तिरंग्याला सॅल्युट करतो. जो मुस्लीम सर्वधर्मीय सणांमध्ये सहभागी होतो, जो मुस्लीम भारत हा देश आपला आहे असं मानतो ते सर्व मुस्लीम भारतीय आहेत, असे आपण मानतो. तर उर्वरित मुस्लीम जे देशविरोधी कारवाया करतील त्यांच्याविरोधात आपण १०० टक्के आवाज उठवणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. जे बांगलादेशींना मदत करतील त्यांना एकाच विमानात बसवून बांगलादेशला पाठवणार असेही त्यांनी सांगितले. एलईडी लाईटद्वारे होणारी मासेमारी मत्स्य उत्पादनासाठी अधिक धोकादायक आहे. या मासेमारीद्वारे छोटे मासेही मारले जातात. महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय धोरणातील नियमानुसार एलईडी मासेमारीवर पूर्णतः बंदी आहे. परंतु कायद्याचा धाक अधिकारी दाखवत नसल्यामुळे खुलेआम एलईडी मासेमारी सुरू आहे. यापुढे एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या नौका जप्त करण्याचे आदेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय विभागाला दिले आहेत.सागरी सुरक्षा, एलईडी मासेमारी, पर्ससीननेट मासेमारी, किनारपट्टीवर अनधिकृत बांधकाम यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. काही बंदरांतून देशविरोधी कारवाया केल्या जात आहेत त्यावर आपल्या विभागाचे लक्ष आहे. त्या कारवाया तत्काळ थांबल्या पाहिजेत. याबाबतची माहिती आपण पोलिसांना दिली आहे. पोलीस त्याबाबतची कारवाई करतील असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला
Home Uncategorized बांगलादेशी रोहिंग्ये , अनधिकृत बांधकामे, बेकायदेशीर मासेमारी चालणार नाही : नितेश राणे