तृतीयपंथी व्यक्तींनी ओळखपत्र मिळवण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा

0
143

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

तृतीयपंथी, सेक्स वर्कर (वारांगना), देवदासी, एचआयव्ही बाधित 20 व्यक्तींना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते डिजिटल रेशन कार्ड वितरीत

कोल्हापूर, दि.21 (जिमाका): तृतीयपंथी, सेक्स वर्कर (वारांगना), देवदासी, तमाशा कलावंत, एचआयव्ही बाधित व्यक्तींसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येतात, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या सर्व व्यक्तींनी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधून ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

 जिल्ह्यातील तृतीयपंथी, सेक्स वर्कर (वारांगना), देवदासी, तमाशा कलावंत, एचआयव्ही बाधित इ. व्यक्ती शासकीय कागदपत्रांअभावी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी श्री.येडगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्राधान्य कुटुंब लाभ योजने अंतर्गत 20 व्यक्तींना मोफत शासकीय धान्य वितरणासाठीचे डिजिटल रेशन कार्ड वितरीत करण्यात आले. यावेळी कोल्हापूर शहराचे अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे -पाटील, पुरवठा निरीक्षक महेश काटकर, कोल्हापूर जिल्हा रेशन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ.रवींद्र मोरे, उपाध्यक्ष गजानन हवालदार, तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या राष्ट्रीय सदस्य मयुरी आळवेकर आदी उपस्थित होते.


 जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे -पाटील यांनी पुढाकार घेऊन आधी विशेष शिबिर आयोजित करुन या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बनवून घेतले. यानंतर त्यांना मोफत अन्नधान्य वितरणासाठीच्या प्राधान्य कुटुंब लाभ योजनेसाठी पात्र करण्यात आले. आज या योजनेतून या व्यक्तींना डिजिटल रेशन कार्डाचे वितरण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. 

मैत्री संघटने च्या वतीने मयुरी आळवेकर यांनी याबाबत पुरवठा कार्यालयाकडे विनंती अर्ज सादर केला होता. यापूर्वीही 25 व्यक्तींना या योजनेतून लाभ वाटप करण्यात आला आहे. या वंचित घटकातील उर्वरीत 200 व्यक्तींनी समाज कल्याण विभागाकडून ओळखपत्र लवकरात लवकर प्राप्त करुन घ्यावे, जेणेकरून त्यांना डिजिटल रेशन कार्ड वितरित करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here