प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर, दि. 21 : सी.पी.आर. प्रशासनामार्फत सध्या वर्ग-४ ची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरतीप्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून नागरिकांनी कोणत्याही आमिषाला व भूलथापांना बळी पडू नये. या भरतीप्रक्रियेसंदर्भात कोणतीही शंका अथवा तक्रार असल्यास सी.पी.आर. प्रशासनाशी ०२३१-२६४१५८३ अथवा ९०७५७४०९९६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी केले आहे.जिल्हाधिकारी अमोल येडगे व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे यांच्या बोगस सहीच्या अधारे शिपाई व क्लार्क या पदांच्या नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र देण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.अशा प्रकारचे कोणतेही नियुक्ती आदेश अधिष्ठाता यांनी दिलेले नसून ही बाब उघडकीस आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी याबाबत पोलीस तक्रार दाखल केली आहे. तसेच अशा प्रकारे सक्रिय असणाऱ्या बोगस रॅकेटचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी केले आहे.