कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मे महिन्यापर्यंत बिगुल वाजण्याचे संकेत…

0
46

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मे अखेरपर्यंत घेण्याचे संकेत राज्य शासनाकडून दिले जात आहेत. ओबीसी आरक्षणाच्या निर्माण झालेल्या गुंत्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.राज्यातील महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका यावर्षी होणार आहेत. या निवडणुका पावसाळ्यापूर्वीच होतील, त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मे अखेरपर्यंत घेण्याचे संकेत राज्य शासनाकडून दिले जात आहेत. निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होणार असल्याने प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाच्या प्रमुखांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ऑक्टोबर २०२० पासून लांबली आहे. (Kolhapur Mahapalika)महापालिकेच्या २०१५ च्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक नगरसेवक काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते. काँग्रेसकडे ३२ नगरसेवक होते. त्याखालोखाल ताराराणी आघाडीकडे १९, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे १३, भारतीय जनता पक्षाकडे १३ आणि शिवसेनेकडे ४ नगरसेवक होते. ८१ सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना यांची संयुक्त सत्ता होती. आता मात्र राजकीय समीकरणे बदलली आहेत.कॉंग्रेससमोर मोठे आव्हानलोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे खासदार म्हणून शाहू महाराज मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण होते. परंतु विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव सहन करावा लागला. जिल्ह्यात कॉंग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही. परिणामी पक्षात सध्या शांतता दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. महायुतीच्या आव्हानासमोर महापालिकेच्या राजकारणात काँग्रेस सध्या एकाकी पडणार असेच चित्र आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना पुन्हा महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व मिळवायचे झाले तर मोठा संघर्ष करावा लागणार आहे. त्यांच्यासमोर महायुतीचे मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद शहरात मर्यादित आहे. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करून काँग्रेसला नव्याने मोट बांधावी लागणार आहे.महायुतीची मोठी ताकदराज्यातील सत्तेमुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाला महापालिका निवडणुकीत मोठी ताकद मिळणार आहे. तसेच कोल्हापूरचे सहपालकमंत्रीपद भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याकडे असल्याने त्याचा मोठा फायदा भाजपला होणार आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाची ताकदही चांगली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या प्रकाश अबिटकर यांना मिळाल्याने त्याचा फायदा देखील शिवसेना शिंदे गटाला मिळणार आहे. आमदार राजेश क्षीरसागर स्वत: सक्रिय आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केलेले सत्यजित कदम देखील आहेत. त्यांनी दोन वर्षांपासून महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील महापालिकेवरील वर्चस्वासाठी कंबर कसली आहे. महायुती म्हणूनच निवडणुका लढवल्या जातील. त्यानुसार तिन्ही पक्षाचे नेते त्याबाबत निर्णय घेतील, असे मुश्रीफ यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here