
प्रतिनिधी रोहित डवरी
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक एचपीव्ही लसीकरणाची सोय•
9 ते 18 वयोगटातील 2 लाख 97 हजार शालेय मुली व इतर शाळाबाह्य मुलींचा समावेश
कोल्हापूर, दि.13 : वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक मुलींना ही लस देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना केल्या. कागल तालुक्यातील लसीकरण मोहिमेबरोबरच संपुर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लसीकरण सुरू करण्यात येत आहे. ही मोहिम विविध कंपन्यांचे सीएसआर, दानशूर व्यक्ति, वैद्यकिय शिक्षण व आरोग्य विभागातील अधिकारी यांच्या सहयोगाने राबविण्यात येत आहे. याबाबत प्रत्येक तालुकानिहाय नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध पिंपळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर यांचेसह सर्व तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी उपस्थित होते.यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील तीन लाख मुलींना लस देत असताना शाळाबाह्य मुलींचाही समावेश करावा. तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून ठेवावी. जेणेकरून त्या तालुक्यात लसीकरणावेळी उपलब्ध नसलेल्या मुलींना सोयीनुसार ती लस मिळेल. हे करीत असताना प्रत्येक तालुक्यात पुढिल सात दिवस एचपीव्ही बाबत जनजागृती मोहिम राबवा. या लसीकरणात मार्गदर्शन करणा-या डॉ.राधिका जोशी यांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ सर्वांना दाखवा. तसेच आरोग्य विभागाने लसीकरणाचे महत्त्व सर्व स्तरावर सांगावे. या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रत्येक तालुकानिहाय नियोजन करून आवश्यक लस संख्या दर आठवड्याला कळवू असे सांगितले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांमधील नियोजन शिक्षणाधिकारी करणार आहेत. या मुलींना आवश्यक माहिती देण्यासाठी व पालकांची सहमती घेण्यासाठी प्रक्रिया राबिवण्यात येणार आहे. *अनेक संशोधनातून आणि ट्रायल नंतर लस बाजारात*मंत्री हसन मुश्रीफ यांनी एचपीव्ही लसीकरणाबाबत काही शंका असल्यास आरोग्य विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, अनेक संशोधने झाल्यानंतर तसेच त्याच्या ट्रायल झाल्यानंतरच जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआरने ही लस टोचण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे एचपीव्ही लस विश्वासहार्य असून प्रत्येक पालकाने आपल्या 9 ते 18 वयोगटातील मुलींना ती द्यावी. नुकतेच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावेळी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी याचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. तसेच महाराष्ट्र राज्यातही या लसीकरणाबाबत लवकरच उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितले असल्याने त्यांनी यावेळी सांगितले.