
SP-9 प्रतिनिधी
मुंबई : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर द्वारा संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासंदर्भात शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात विशेष बैठक पार पडली. सदर महाविद्यालयाच्या हस्तांतरण प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी तुळजापूर भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या विचार करता येत्या जूनपासून श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, न्यायालयीन प्रकरणांच्या संदर्भात धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक माहिती संकलित करून विधी व न्याय विभागाकडे पाठवण्याचे निर्देशही यावेळी पाटील यांनी दिले.
या बैठकीस आमदार राणा जगजितसिंह पाटील, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, उपसचिव संतोष खोरगडे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.