
पुणे प्रतिनिधी;: वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल सादर करा!**पुढील आठवड्यात मनपा आयुक्तांसोबत बैठक घेऊन चर्चा- ना. पाटील*कोथरूड मधील रस्ते, पाणी प्रश्नी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चांगलेच आक्रमक झाले असून, वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी आजच्या बैठकीत दिले. तसेच, पुढील आठवड्यात सदर अहवालाच्या अनुषंगाने आयुक्तांसोबत बैठक घेऊन मार्ग कढण्याबाबत आश्वस्त केले.कोथरुड मधील रस्ते, पाणी, वाहतूक कोंडी आदी प्रमुख विषयासंदर्भात ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

या बैठकीला महापालिकेचे मालमत्ता विभागाचे अतिरिक्त आयुक्त महेश पाटील, पाणीपुरवठा विभागाचे नंदकुमार जगताप, भवन विभागाचे युवराज देशमुख, महसूल विभागाचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, विलास भालेराव यांच्या सह भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीला कोथरुड मतदारसंघातील पाणीपुरवठ्यातील अडचणींची माहिती ना. पाटील यांनी घेतली. यात प्रामुख्याने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वस्ती आणि सोसायटी भागात समान पाणीपुरवठा व्हावा; यासाठी महापालिकेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. कोथरुड मधील वस्ती भाग हा अनेक ठिकाणी चढावर वसलेला असल्याने; उन्हाळ्यात पाणीपुरवठा करताना मर्यादा येत असल्याची बाब अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणली. यामध्ये प्रामुख्याने सुतारदरा, किष्किंधा नगर केळेवाडी भागावर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आणून दिले, त्यावर उपाय म्हणून लोकसहभागातून वस्ती भागाच्या सुरुवातीला पाण्याच्या टाक्या उपलब्ध करुन देऊ; सदर टाक्यांमध्ये महापालिकेने पाणी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.याशिवाय कोथरुड मधील विकास आराखड्यातील रस्त्यांबाबतही बैठकीत चर्चा झाली. यामध्ये परांजपे शाळेसमोरील डीपी रस्त्यामधील एक रहिवासी न्यायालयात गेल्याने, सदर ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याची बाब पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर सदर रस्ता नागरिकांच्या सुविधेसाठी आवश्यक असल्याने महापालिकेने न्यायालयात प्रभावी बाजू मांडावी, अशी सूचना केली. याशिवाय चांदणी चौकातील मुख्य महामार्गालगत एकलव्य महाविद्यालय येथून जाणाऱ्या १५ मीटरच्या रस्त्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याबाबत खंत व्यक्त केली. तसेच, हा प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी सदर भागातील अतिक्रमणे हटवावित. त्यासोबतच रस्त्याचे काम निश्चित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय बाणेर बालेवाडी भागातील नागरिकांची सातत्याने नाट्यगृहाची मागणी होत आहे. त्याशिवाय कोथरुड मध्येही शास्त्रीय नृत्यासह इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी संकुल उभारण्याची मागणी स्थानिक नागरीक तथा कलाप्रेमींकडून सातत्याने होत आहे. दोन्ही मागण्यांच्या अनुषंगाने जागा आणि नाट्यगृह तथा संकुल उभारण्यासाठी अपेक्षित खर्च आदींवर सविस्तर अध्ययन करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, या विषयांसह मतदारसंघातील इतर समस्यांसंदर्भात वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल तयार करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी बैठकीत दिले. सदर अहवालाच्या अनुषंगाने आयुक्तांसोबत बैठक घेऊन मार्ग काढू, असे यावेळी आश्वास्त केले.