शाहुवाडी प्रतिनिधी : अमर पाटील
जपानच्या कोयासन विद्यापीठाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी जाहीर केल्याबद्दल त्यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाऊन राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा ठराव संमत करण्यात आला. याशिवाय चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेबद्दल इस्रोतील सर्व शास्त्रज्ञांच्या अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला.
तसेच गेली ९ वर्षे देशाची अविरत सेवा करून देशात सुशासन आणि भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण केल्याबद्दल, तसेच देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.
तसेच राज्यात महायुती सरकारने केलेली विकासकामे आणि घेतलेले लोकाभिमुख निर्णय थेट लोकांपर्यंत पोहचवून पुन्हा एकदा केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता आणण्याचा निर्धार जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी या बैठकीत केला.
या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल,प्रहार संघटनेचे बच्चू कडू,राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर,रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत,बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्यासह महायुतीतील भारतीय जनता पार्टी,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्षांचे सर्व प्रमुख नेते,मंत्री,खासदार आदी मान्यवर उपस्थित होते.