खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल होऊनही सावकार मात्र मोकाटच मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार..
कोल्हापूर : सावकाराच्या जाचाला वैतागून आकुर्डे (ता. पन्हाळा) येथील विठ्ठल आनंदराव पाटील यांनी कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिलेला आहे.मुख्यमंत्र्यांसह पोलिसांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कळेतील खासगी सावकार अशोक राजाराम पाटील व अवधूत अशोक पाटील यांनी त्रास देऊन २९ लाख रुपयांची जादा वसुली केली आहे. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर सावकारांनी २७ लाख रुपये परत केले. पण त्यानंतर लगेचच त्यांनी माझ्या मुलाचे अपहरण करून आणि मला धमकावून परत दिलेले सर्व पैसे काढून घेतले.याबाबत मी कळे पोलिस ठाण्यात सावकार आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध तक्रार दिली आहे. मात्र माझ्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे मी कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केले होते. त्याची दखल घेऊन सावकाराविरुद्ध अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला. पण गुन्हा फक्त कागदोपत्री नोंदविला गेला. पोलिसांनी त्यांना वेळीच अटक न केल्यामुळे अटकपूर्व जामीन मिळाला. त्यानंतर या सावकारांनी व त्याच्या साथीदारांनी मला पुन्हा त्रास देऊन धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. याबाबतही मी कळे येथील पोलिस ठाण्यात अनेकवेळा तक्रारी दिल्या. पण तक्रारींची दखल घेतली जात नाही. त्यामुळे याखासगी सावकाराच्या व त्याच्या साथीदारांच्य त्रासाला वैतागून मी मार्च महिन्यात आत्महत्येच प्रयत्न केला. पण सुदैवाने त्यातून वाचलो. याबाबतह कळे पोलिसात तक्रार दाखल केली. पण त्याचीर्ह दखल घेतली गेली नाही.मी सहकार विभागाकडेही पुराव्यानिशी तक्रार केली असता वर्षभराने छापे टाकले. पण पुढे काहीच झाले नाही. त्यानंतर याप्रकरणी दहा दिवसांच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते. पण पुढे काही झाले नाही. त्यामुळे १५ दिवसाच्य आत कारवाई झाली नाही तर मी कुटुंबासह मंत्रालय समोर मुंबई दिनांक 16/6/2025 रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा विठ्ठल पाटील यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.