
प्रतिनिधि -जानवी घोगळे
पुणे, २७ जुलै : भाजपा पश्चिम महाराष्ट्र विभाग जिल्हानिहाय संघटनात्मक बैठकी दरम्यान आज भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याबद्दल पाटील यांनी अभिमान व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश होणे ही केवळ महाराष्ट्राच्या दृष्टीने नव्हे तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झालेल्या मन की बात कार्यक्रमात केले. याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी पैठण तालुक्यातील पैठणी निर्मिती उद्योग चालविणाऱ्या कविता ढवळे यांच्या कामाचेही कौतुक केले. युनेस्कोने मराठा साम्राज्याच्या 12 किल्ल्यांना ‘जागतिक वारसा स्थळ‘ म्हणून मान्यता दिली आहे. या प्रत्येक किल्ल्याच्या इतिहासाचे एक – एक पान जोडले आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलेला प्रत्येक दगड, प्रत्येक चिरा हा ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंदजी देशपांडे, आ. शंकरभाऊ जगताप, महेशदादा लांडगे, उमाताई खापरे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शत्रुघ्न कांटे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.