प्रतिनिधि -जानवी घोगळे
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाचा आढावा • प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे पालकमंत्र्यांकडून कौतुक
कोल्हापूर, दि. २४ : “प्रशासनाने भविष्यात कोणत्याही प्रकारची जाणीवपूर्वक दिरंगाई करू नये, नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवावेत,” असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत झालेल्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेताना ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, महसूल विभागाने वितरित केलेले विक्रमी दाखले, कृषी विभागाने आयोजित केलेला ‘एक दिवस बळीराजासाठी’, जिल्हा परिषदेने शाळांबाबत मिळवलेले यश आणि अंगणवाडी सेविकांच्या सेवेतील सुधारणा यामुळे नागरिकांच्या मनात प्रशासनाबद्दल सकारात्मकता निर्माण झाली आहे. हेच कामकाज आगामी काळात अधिक गतिमान पद्धतीने व्हावे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान १ मे महाराष्ट्र दिनापासून १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत राबवले जात असून, “या अभियानाचा उद्देश लोककल्याणकारी शासन तत्त्वांवर आधारित आहे. प्रशासकीय कामकाजात गतिमानता, दर्जात्मक सुधारणा, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवणे या बाबींचा यात समावेश आहे,” असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.
अभियानातील कामांचा प्रत्येक शेतकरी आणि नागरिकांना थेट लाभ व्हावा यावर भर देताना ते म्हणाले की, कृषी सहायकांनी गावसभांना उपस्थित राहून शेतकऱ्यांना माती परीक्षण अहवाल समजावून सांगावे. गावस्तरावरील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ कर्मचारी प्रशिक्षित करावेत. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी आणि शासकीय कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.
या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी १ मे पासून झालेल्या कामांचा सादरीकरणाद्वारे आढावा दिला. महसूल विभागाने विक्रमी १ लाख ८७ हजार दाखले वितरित केले, जिल्हा परिषदेने अंगणवाडी सेविका सेवापुस्तक नोंद, एलआयसी पॉलिसी व अपघात विमा बाबतची कामे, घरकुल योजनेतील प्रगती, फेरफार नोंदी व दाखले वितरण कालावधी कमी करणे, आदर्श शाळा मोहीम, शेतकरी संवाद आदी उपक्रम राबवण्यात आले.
पालकमंत्र्यांनी सर्व विभागांचे कौतुक करत “१५ ऑगस्टपर्यंत ही मोहीम यशस्वी राबवावी,” असे आवाहन केले. तसेच, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली अभियानाची अंमलबजावणी सुयोग्य पद्धतीने होत असल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदनही केले.