प्रतिनिधी -जानवी घोगळे
करवीर तालुका, बीडशेट – भोगावती नदीपात्रात पाय घसरून पडलेल्या एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सुटका करण्याची धडपड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने यशस्वीपणे केली. बीडशेट गावातील श्री. गणपती बाबू सावंत हे दररोजप्रमाणे नदीपात्रामध्ये हात-पाय धुण्यासाठी गेले होते. मात्र, पाय घसरल्याने ते थेट पाण्यामध्ये पडले.

पात्रामध्ये असलेल्या एका झाडाचा आधार घेत त्यांनी स्वतःचा जीव वाचवत सुमारे एक तास त्या झाडावरच लटकून थांबावे लागले. त्यांनी मदतीसाठी आवाज दिला, तेव्हा काही स्थानिक नागरिकांनी तात्काळ ही माहिती प्रशासनाला कळवली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव मोहीम सुरू केली. जवान प्रीतम केसरकर आणि कृष्णात सोरटे यांनी अत्यंत धैर्याने आणि कौशल्याने ही मोहिम पार पाडत श्री. सावंत यांना सुखरूप पाण्याबाहेर काढले व त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केले.
या संपूर्ण घटनेनंतर गावकऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे व विशेषतः सहभागी जवानांचे आभार मानले. योग्य वेळी केलेल्या कार्यवाहीमुळे एक अनर्थ टळला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.