
प्रतिनिधी जानवी घोगळे
आळवे (ता. पन्हाळा) : गावातील भैरवनाथ तालीम आळवे येथील मल्ल शिवराज भगवान यादव याने आपल्या दमदार खेळीच्या जोरावर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची निवड आता जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे.
शिवराज यादव याच्या या यशामागे वस्ताद आदिनाथ बंगे यांचे कुशल प्रशिक्षण व पालक भगवान यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सातत्यपूर्ण सराव, चिकाटी आणि जिद्द या बळावर त्याने प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत पहिला क्रमांक मिळविला.
गावातील तालीम मंडळ, ग्रामस्थ व कुस्तीप्रेमींनी शिवराजचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेत तोही तितकाच उत्तुंग यश मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
कुस्ती या पारंपरिक खेळाला मिळणारे हे यश केवळ आळवे गावासाठीच नव्हे, तर संपूर्ण पन्हाळा तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.