
प्रतिनिधी जानवी घोगळे
पिक उत्पादकतेमध्ये वाढ होण्यासाठी नॅनो खते वापरण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये स्वदेशी नॅनो खतांचा वापर करुन विषमुक्त शेती व आत्मनिर्भर भारत-आत्मनिर्भर कृषी या परिसंकल्पनेस साकार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग व इफको मार्फत आयोजित नॅनो खते जागरुकता अभियान शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, वरिष्ठ व्यवस्थापक इफको महाराष्ट्र डॉ.एम.एस. पोवार, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, कृषी उपसंचालक नामदेव परीट, मोहीम अधिकारी सुशांत लव्हटे, तालुका कृषी अधिकारी, करवीर युवराज पाटील, कृषी अधिकारी पंचायत समिती, करवीर सतीश देशमुख, क्षेत्र अधिकारी, इफको विजय बुनगे तसेच खत व्यवसाय करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, इफको ही शेतकऱ्यांची स्वतःची असलेली संस्था त्यांच्या हितासाठी सदैव काम करीत आली आहे. रासायनिक खतांच्या अमर्याद वापराने होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व संतुलित खत व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्यासाठी नॅनो खतांचा शोध लावण्यात आला आहे. तर यावेळी जालिंदर पांगरे यांनी नॅनो खतांचे लाभ- पीक उत्पादन व गुणवत्तेत वाढ, रासायनिक खतांच्या वापरात घट, वायू, जल व मृदा प्रदूषणात घट, कीड व रोगांचा प्रभाव कमी, वाहतूक आणि साठवणुकीमध्ये सुलभ, पूर्णतः सुरक्षित व हानीविरहित, उत्तम बीज अंकुरण व रोपांच्या वाढीसाठी नॅनो डीएपीचा वापर करावा याबाबत माहिती दिली. नॅनो युरिया प्लस व नॅनो डीएपी दाणेदार युरिया व डीएपीचा उपयोगी पर्याय आहे. पिकामध्ये झिंकची कमतरता असल्याने नॅनो झिंकचा वापर करावा तसेच नॅनो कॉपर रोपांची उत्तम वाढ व पिकांकरिता लाभदायक असून नॅनो खत भारत सरकारच्या पीएम प्रणाम योजनेकरिता अनुकूल असल्याचे डॉ.एम.एस. पोवार यांनी सांगितले.

नॅनो खत खरेदीवर 2 लाखापर्यंतचा निःशुल्क दुर्घटना विमा
संकटहरण विमा योजनेअंतर्गत नॅनो खत खरेदीवर कमाल 2 लाखांपर्यंतचा निःशुल्क दुर्घटना विमा मिळणार आहे. राज्यनिहाय नॅनो खतांच्या वापराने शेतकऱ्यांना आलेला अनुभव कृषी विद्यापीठे व शोध संस्थांच्या परीक्षणाचा अहवाल प्रकाशित लेख व क्षेत्र परीक्षणाच्या (ट्रायल) निष्कर्षाशी संबंधित माहिती इफकोने संकेतस्थळावर टाकली आहे.
शेतकऱ्यांनी नॅनो खतांची योग्य वापर पद्धती स्वीकारून आपल्या शेतीमध्ये एक वेळ जरूर वापर करावा. समित्या, विक्रेत्यांनी नॅनो खतांची विक्री शेतकऱ्यांना तांत्रिकी माहिती देऊनच करावी अर्थात, अन्य कृषी आदानांबरोबरच दबाव व टॅग न करता करावे,

जर एखादा विक्रेता असे करीत असल्यास त्याची माहिती 1800 103 1967 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी किंवा संबंधित जिल्ह्याच्या इफको क्षेत्र अधिकारी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.याबाबतची माहिती या अभियानातून सर्व नागरिकांना देण्यात येणार आहे.