
प्रतिनिधी जानवी घोगळे
मोठ्या गर्दीत पण कायद्याच्या चौकटी पाळून गणेशोत्सव साजरा करा, पारंपरिक वाद्यांचा वापर करा; ‘गणराया अवॉर्ड’ यावर्षीपासून पुन्हा सुरु
- पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता
पाऊस थांबल्यावर रस्ते दुरुस्ती करण्यात येणार
– महानगरपालिका आयुक्त डॉ. के मंजूलक्ष्मी
‘नो डीजे, नो डॉल्बी, नो लेझर..’ चा संदेश देशाला देऊया
- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.
कोल्हापूर, दि.31 (जिमाका): नियमांचे पालन करुन पर्यावरणपूरक पद्धतीने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

शांतता व दक्षता समिती सदस्य तसेच गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शाहू स्मारक भवन येथे बैठक घेण्यात आली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा कोल्हापूर जिल्ह्याने आजवर जपला आहे. नियमांचे पालन करणारा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरने पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. सर्व गणेश मंडळांनी पर्यावरण रक्षणासह विविध सामाजिक संदेशावर आधारित देखावे सादर करावेत. मंडळांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत ध्वनी मर्यादा ओलांडली जाणार नाही, लेझरचा वापर होणार नाही याची दक्षता घेऊन तसेच कोणतेही गालबोट लागू न देता हा उत्सव आनंदाने साजरा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी यावेळी केले.