
प्रतिनिधी जानवी घोगळे
जिल्ह्यातील तरुण, तरुणी, महिला व नागरिकांच्या उपस्थितीने मोठ्या गर्दीत पण कायद्याच्या चौकटी पाळून उत्साहाने गणेशोत्सव साजरा करुया, असे आवाहन करुन समिती सदस्य व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘गणराया अवॉर्ड’ यावर्षीपासून पुन्हा सुरु करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिले.
श्री. गुप्ता म्हणाले, गणेशाच्या मूर्तीचा आकार डॉल्बीचा आवाज मंडळाभोवती जमणाऱ्या नागरिकांची संख्या मोठा मंडप यावर गणेशाची श्रद्धा ठरत नाही. कोल्हापूरला गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. गणेश मंडळांनी आपल्या मंडळांच्या देखाव्यांमधून ‘स्वस्थ आणि सुरक्षित कोल्हापूर’ चा संदेश द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन अशा मंडळांना पोलीस विभागाचे पथक भेट देण्याबरोबरच आरतीमध्येही सहभागी होऊन मंडळांच्या अडचणी जाणून घेईल, असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवामध्ये लेझरचा वापर करु नका. डीजेला बंदी नसली तरीही आवाजाची मर्यादा पाळा. पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर द्या. देखाव्यांमधून सामाजिक संदेश द्या, असे आवाहन श्री. गुप्ता यांनी केले.

कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी विभागनिहाय निधी वाटप करण्यात येत असून पाऊस थांबल्यावर रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात येतील. गणेशोत्सव व मिरवणूक काळामध्ये विद्युत व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नियोजन केले जाईल.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो. सामाजिक बदल घडवणे ही आव्हानात्मक बाब असली तरीही कोल्हापुरात मात्र असे बदल घडल्याचे पर्यावरणपूरक गणेशोत्सव व अन्य उपक्रमातून दिसून आले आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये ‘नो डीजे, नो डॉल्बी, नो लेझर..’ चा संदेश देशाला कृतीतून देऊया आणि चित्रनगरीसाठी प्रसिद्ध असणारे कोल्हापूर शांततानगरी असल्याचे दाखवून देऊया, असे आवाहन श्री. कार्तिकेयन यांनी केले.

सीपीआरचे हृदयविकार विभाग प्रमुख डॉ. अक्षय बाफना तसेच कान, नाक, घसा तज्ञ डॉ. संतोष कुलकर्णी म्हणाले, हृदय, कान व डोळे हे शरीराचे अत्यंत महत्वाचे अवयव आहेत. या अवयवांच्या सुरक्षिततेसाठी तसेच मानवी आरोग्यासाठी गणेशोत्सव, विसर्जन मिरवणूक तसेच अन्य सण समारंभा दरम्यान आवाजाची मर्यादा पाळणे आवश्यक आहे. तसेच लेझरचा वापर अत्यंत हानिकारक असून तो टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
शांतता व दक्षता समितीचे सदस्य तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. मिरवणूक काळामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी हेल्पलाइन क्रमांक द्यावा, मिरवणूक मार्गावर विद्युत व्यवस्था सुरळीत रहावी, सर्व गणेश मंडळांना महाद्वार रोडवरील मिरवणुकीत सहभागी होता येण्यासाठी मिरवणूक रेंगाळणार नाही यासाठी उपाययोजना व्हावी, सर्व मंडळांना समान न्याय द्यावा, शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, आदी सूचना मांडून कोल्हापूरचा गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
सूत्रसंचालन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक खानापूरेयांनी केले. आभार पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी मानले.