
प्रतिनिधी जानवी घोगळे
महसूल विभागाची ओळख गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख करा
जिल्हा महसूल विभागाच्या आढाव्यादरम्यान मंत्र्यांचे प्रतिपादन
विभागाच्या कामगिरीबद्दल मंत्र्यांकडून अभिनंदन
कोल्हापूर, दि. ३१ जुलै : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ च्या दृष्टिकोनातून काम करताना सर्वच विभागांनी आपले सर्वोच्च योगदान देणे आवश्यक आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल विभागाने अग्रस्थान मिळवावे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल विभागाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते दृकश्राव्य प्रणालीद्वारे बोलत होते.

महसूलमंत्री म्हणाले, महसूल विभागाची ओळख गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख बनवण्याची जबाबदारी तलाठ्यापासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांची आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून महसूल विभागाचे लेखापरीक्षण झाल्यास महाराष्ट्र अग्रस्थानी राहील, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत.

या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्यासह जिल्हास्तरीय सर्व महसूल अधिकारी उपस्थित होते. तसेच, दृकश्राव्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार सहभागी झाले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महसूल विभागांतर्गत जिल्ह्यातील कामकाजाचे सविस्तर सादरीकरण केले. यानंतर बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करावी. आठवड्यातून एकदा सर्व महसूल अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घ्यावा. बांधकामासाठी आवश्यक वाळू वेळेत उपलब्ध होण्यासाठी शासन निर्णयाचा सखोल अभ्यास करावा. जिल्ह्यातील उपलब्ध वाळू घाटांचे सर्वेक्षण काटेकोरपणे करून उपलब्ध वाळूच्या प्रमाणात लिलाव झाले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत वाळू चोरी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

त्यांनी गौण खनिज दंडासंदर्भातील प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिले. तसेच, नव्याने आढळणाऱ्या प्रकरणांमध्ये महसूल आणि पोलिस कारवाया एकाच वेळी होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे सांगितले. महसूल अधिकाऱ्यांनी गावागावांत शिबिरांचे आयोजन करून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. अशा शिबिरांमधून नागरिकांना मिळालेल्या मदतीच्या यशोगाथा विविध माध्यमांद्वारे प्रसिद्ध कराव्यात आणि महसूल विभागाचा सकारात्मक दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
लोकाभिमुख महसूल अभियानात प्रभावशाली व्यक्ती आणि माध्यमांचा समावेश करा
महसूलमंत्र्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील प्रभावशाली व्यक्ती, सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध असणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी यांचा या अभियानात समावेश करावा. त्यांच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहोचेल. तसेच, विविध माध्यमांचा वापर करून शासकीय योजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

कोल्हापुरात महसूल विभागाच्या तक्रारी घेऊन येणारा कोणीही नसावा
महसूलमंत्री बावनकुळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले, जिल्ह्यातील महसूल विभागाचे काम अत्यंत समाधानकारक आहे. यापुढेही असाच वेग आणि गुणवत्ता कायम ठेवा. सर्व प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवाव्यात. नागरिकांच्या तक्रारी कमी वेळेत निकाली निघाल्या पाहिजेत. आवश्यकता भासल्यास जनहितासाठी शासन निर्णयात बदल करणे गरजेचे असेल, तर त्याबाबत लेखी प्रस्ताव सादर करा. त्यावर योग्य कार्यवाही करू.
ते पुढे म्हणाले, मी जेव्हा कोल्हापूर जिल्ह्यात येईन, तेव्हा कोणत्याही नागरिकाची तक्रार माझ्यापर्यंत येऊ नये. अशा पद्धतीने पारदर्शी आणि कार्यक्षम कामकाज करावे, अशी माझी अपेक्षा आहे.