कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आल्याने सर्वसामान्यांना महागाईमधून थोडासा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून सिलेंडरच्या किमतीमध्ये २०० रुपयांनी घट करण्यात आल्यानंतर महाराष्ट्राशेजारील गोवा सरकारने मोठी घोषणा केली आहे.
राज्य सरकारने केलेल्या घोषणेनंचर अंत्योदय अन्न योजनेच्या कार्डधारकांना गॅस सिलेंडर केवळ ४२८ रुपयांना मिळणार आहे. गोव्यामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत एलपीजी सिलेंजरच्या रिफिलिंगसाठी मुख्यमंत्री वित्तीय सहाय्यता योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत राज्यात अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांना सिलेंडरवर राज्य सरकारकडून २७५ रुपये सब्सिडी देण्यात येईल. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी एलपीजी सिलेंडरसाठी २०० रुपयांची सब्सिडी देण्याची घोषणा केली होती.
केंद्र सरकारची २०० रुपयांची सब्सिडी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिली जात आहे. याशिवाय गोवा सरकारकडून एएवाय अंत्योदय रेशन कार्ड धारकांसाठी दरमहा २७५ रुपये अतिरिक्त देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
राज्यामध्ये ११ हजारांहून अधिक लोकांजवळ एएवाय (अंत्योदय) कार्ड आहेत. अशा कार्डधारकांना उज्ज्वला योजनेतील २०० रुपयांची सब्सिडी आणि २७५ रुपयांची गोवा सरकारकडून दिली जाणारी सब्सिडी मिळणार आहे. एकूण रेशनकार्ड धारकांना ४७५ रुपयांची सब्सिडी दिली जाणार आहे. अंत्योदय अन्न योजना एएवाय गरीब कुटुंबाच्या कुटुंबीयांच्या गरजांची पूर्तता करते.
रक्षाबंधनानिमित्त घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये २०० रुपयांनी घट केल्याने पणजीमध्ये १४.२ किलो वजनाचा सिलेंडर ९०३ रुपयांना मिळणार आहे. तर दक्षिण गोव्यामध्ये याची किंमत ही ९१७ रुपये आहे.
तसेच ९०३ रुपयांच्या हिशेबाने पाहिल्यास २०० रुपये उज्ज्वला योजनेचे आणि राज्य सरकारचं २७५ रुपये अनुदान एकत्र केल्यानंतर गॅस सिलेंडरची किंमत ४२८ रुपये उरते. मात्र अशा लाभार्थ्यांना गॅस एजन्सीला सिलेंडरच्या पूर्ण किमतीचा भरणा करावा लागेल.