
प्रतिनिधी जानवी घोगळे
कोल्हापूर/मुंबई (प्रतिनिधी) –
कोल्हापूरची कन्या, अभिनेत्री श्वेता कामत हिची मुख्य भूमिका असलेला ‘हॅलो कदम’ हा मराठी चित्रपट दि. २२ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. रहस्यमय आणि उत्कंठावर्धक कथानकामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यापासून चित्रपटगृहांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपट सलग दोन आठवडे हाउसफुल चालू असून, पुढील आठवड्यात तो महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये नव्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील प्रेक्षकांकडून मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता, या चित्रपटाचे आणखी अनेक शो लावले जात आहेत.

श्वेता कामतची भूमिका आणि अभिनय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला असून, तिच्या स्क्रीनवरच्या प्रभावी उपस्थितीबरोबरच रहस्यमय कथा, संगीत आणि दिग्दर्शनाची मांडणीही प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवून गेली आहे.
कोल्हापूरसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहरातून चित्रपटसृष्टीत नावारूपाला आलेली श्वेता कामत हिचा हा चित्रपट स्थानिक प्रेक्षकांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला आहे.
स्थानिक पातळीवरून शुभेच्छांचा वर्षाव होत असून,
“कोल्हापूरच्या या लेकीला कोल्हापूरकरांचं शुभेच्छा आणि शुभाशिर्वादाचे पाठबळ लाभो, हीच बाप्पाचरणी व श्री महालक्ष्मी चरणी प्रार्थना” अशा भावना नागरिक व चित्रपटप्रेमी व्यक्त करत आहेत.